टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांच्या पंचगिरीसाठी आम्ही अनेक ठिकाणी जातो, परंतु आजवरच्या आमच्या अनुभवात अन्य शहरांच्या तुलनेत खेळाच्या बाबतीत बेळगाव शहरातील क्रीडाप्रेमी जनता अतिशय सहकार्य करणारी आणि शांत आहे, असे प्रशंसोद्गार आमदार अनिल बेनके करंडक खुल्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठीच्या प्रमुख पंचांनी काढले.
भव्य बक्षीस रकमेच्या आमदार अनिल बेनके करंडक खुल्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज शुक्रवारपासून शहरातील सरदार्स हायस्कूल मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना स्पर्धेसाठी नियुक्त प्रमुख पंच कोल्हापूरचे सुनील गणेश पाटील आणि मुंबईचे रोहित चांदेकर यांनी उपरोक्त प्रशंसोद्गार काढले.
ते पुढे म्हणाले की, बेळगावातील मोठ्या प्रमुख टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पंचगिरी करण्यासाठी आम्हाला कायम निमंत्रित केले जाते. मात्र आतापर्यंत आम्ही फक्त टिळकवाडीच्या व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या साईराज क्रिकेट स्पर्धा, श्री चषक क्रिकेट स्पर्धा आदी स्पर्धांसाठी पंचगिरी केली आहे. पंचगिरी हे एकूणच अत्यंत जबाबदारीचे काम असते. क्रिकेटचे पंच म्हणून सामन्यादरम्यान घडणाऱ्या खेळाडूंच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवून आम्हाला नि:पक्षपातीपणे निर्णय द्यावा लागतो.
हे निर्णय देताना कांही वेळा वादग्रस्त प्रसंग निर्माण होतात. त्यावेळी आम्हाला आमचा निर्णय कसा योग्य आहे हे प्रतिस्पर्धी खेळाडूंना पटवून द्यावे लागते. जे मान्यता प्राप्त अथवा अनुभवी क्रिकेट पंच असतात त्यांचे निर्णय सहसा चुकीचे ठरत नाहीत, असे क्रिकेट पंच सुनील पाटील व चांदेकर यांनी सांगितले.
क्रीडाप्रेमींच्या बाबतीत बोलायचे झाल्यास इतर शहरांच्या तुलनेत बेळगावचे क्रीडाप्रेमी अतिशय शांत आणि सहकार्य करणारे आहेत. सरदार हायस्कूल मैदानावर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदाच पंचगिरी करणार आहोत. गेल्या 5 -6 वर्षांपासून आम्ही बेळगावात फक्त व्हक्सीन डेपो मैदानावर पंचगिरी केली आहे. इतर शहरांच्या तुलनेत बेळगाव शहरातील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन देखील उत्तम असते. खेळाडूंची तुलना करायची झाल्यास बेळगाव काय किंवा इतर ठिकाणचे खेळाडू काय सर्वच व्यवसाय खेळाडू उत्तम दर्जाचे असतात असे ते म्हणाले. मुंबई, कोल्हापूर वगैरे ठिकाणच्या वेडाच्या (क्रेझ) तुलनेत बेळगावातील टेनिस बॉल क्रिकेटचे वेड जास्त आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भवितव्य नसले तरी यातील उत्साह लेदर बॉल क्रिकेट पेक्षा जास्त पहावयास मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात टेनिस बॉल क्रिकेटपटूंसाठी देखील सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्यात आले आहे. तसे कर्नाटकात देखील ठेवले पाहिजे का? या प्रश्नाला उत्तर देताना लेदर बॉल क्रिकेटपटूंप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटपटूंना देखील उज्वल भवितव्य असले पाहिजे.
मातब्बर टेनिस बॉल क्रिकेटपटूंना आपला चरितार्थ चालवता यावा यासाठी सरकारने काहीतरी सोय केली पाहिजे. यासाठी टेनिस बॉल क्रिकेटपटूंसाठी कर्नाटक सरकारने देखील सरकारी नोकरीत राखीवता ठेवली पाहिजे, असे मत सुनील पाटील आणि रोहित चांदेकर या क्रिकेट पंचांनी शेवटी व्यक्त केले.