मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदवाडी बेळगाव येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती भांदूर गल्ली तालमीचा कर्नाटक केसरी पै. नागराज बसीडोनी आणि पंजाबचा नॅशनल चॅम्पियन पै. पाॅक्सिंग कुमार यांच्यात खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या कुस्त्या अनुक्रमे साई हॉस्टेल धारवाडचा पै. परमानंद इंगळगी वि. दावणगिरीचा पै. परशराम हरिहर, महाराष्ट्र चॅम्पियन पै. ऋतुराज शेवडे वि. नॅशनल चॅम्पियन पै. सुनील धारवाड, भांदूर गल्ली तालमीचा पै. पवन चिक्कदिनकोप्प वि. इचलकरंजीचा पै. लक्ष्मण जाधव आणि कंग्राळी खुर्दचा पै. रोहित पाटील वि. कोल्हापूरचा पै. शिवानंद अंबी अशा होणार आहेत. याखेरीज या मैदानात लहान-मोठ्या सुमारे 50 चटकदार कुस्त्या आयोजित केल्या जातील. आकर्षक गदा कुस्ती भांदूर गल्ली तालमीचा पै. यशपाल राजस्थान आणि मारुती तालमीचा पै. दीपक धारवाड तर मेंढ्याची कुस्ती साई हॉस्टेल धारवाडचा पै. श्री घाडी येळ्ळूर आणि राशीवडे तालमीचा पै. ओमकार बागेवाडी यांच्यात खेळविली जाईल. सदर कुस्त्यांसह महिलांच्या कुस्त्या हे या मैदानाचे आकर्षण असणार आहे. महिलांच्या आठ कुस्त्या होणार असून प्रथम क्रमांकाची कुस्ती वाघवड्याची पै. कल्याणी अंबोळकर आणि खानापूरची पै. ममता यांच्यात खेळविली जाईल.
कुस्ती आखाड्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर, माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी व उद्योगपती मल्लिकार्जुन जगजंपी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे आखाड्यातील मानाच्या कुस्तीचा शुभारंभ कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस युवा नेते किरण जाधव, उद्योजक पप्पू होनगेकर व स्नेहा स्वीट मार्टचे मालक शिवाप्पा इटगी यांच्या हस्ते केला जाईल. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून बेळगाव जि. पं. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश गोरल,
अनमोल सोसायटीचे चेअरमन संजय वालावलकर, उद्योजक बसवराज भरमशेट्टी, उद्योजक भूषण काकतकर, इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनचे अरविंद पाटील आणि स्वातंत्र्य सैनिक संघाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी उपस्थित राहणार आहेत. तरी क्रीडाप्रेमींसह कुस्ती शौकिनांनी या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचा मोठ्या संख्येने लाभ घेऊन आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.