बेळगाव : जुने वर्ष संपून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यापासूनच विद्यार्थ्यांना चाहूल लागते ती वार्षिक परीक्षेची! प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाचे महत्व अधिक आहे. आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर आपल्याजवळ शिक्षण असणे महत्वाचे आहे. शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेची लगबग देखील आता सुरु झाली असून या परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवणाऱ्या महत्वाचा टप्प्पा आहेत.
परीक्षेची चाहूल विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वळायला भाग पाडत आहे. हे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी सध्या अधिकाधिक गुण आणि टक्केवारीची नितांत आवश्यकता आहे. जितकी गुणांची सरासरी अधिक तितकाच शिक्षणाचा पुढील मार्ग सुकर होतो. गुणांच्या आधारावर पुढे कोणत्या शाखेत शिक्षण पूर्ण करायचे आहे हे ठरविणे सोपे होते.
यामुळे आता विद्यार्थ्यांसमवेत पालकांनाही अभ्यासात रस घ्यावा लागत आहे. भविष्यात यश मिळवायचे असेल तर परीक्षेचे हे टप्पे सर्वात महत्वाचे आहेत. यामुळे या टप्प्यावर अभ्यासाची उंची वाढवून उत्तम गुण संपादित करुन शिक्षणाच्या नव्या युगात जाण्याचा, आणि शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्याचा मार्ग सुखकर होतो.
परीक्षेच्या धास्तीने कित्येक विद्यार्थी आधीपासूनच अभ्यासाची उजळणी करतात. काहीजण बॅकलॉग भरून काढण्यासाठी धडपडतात. आणि काही विद्यार्थी शेवटच्या क्षणापर्यंत आळसामुळे अभ्यासाकडे लक्ष पुरवत नाहीत. याचा फटका कित्येक विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर बसतो. दहावी-बारावी परीक्षेची तारीख महिनाभर आधीच शिक्षण विभागाने जाहीर केली असून विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात केली तर अडचणी, शंका यासंदर्भात शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवून अभ्यास आणखीन सोपा करुन घेता येईल. पूर्वतयारी चांगली असेल तर परीक्षेच्या दरम्यान कोणत्याही गोष्टी अवघड जाणार नाहीत.
जानेवारीनंतर जवळपास एप्रिल महिन्यापर्यंतचा वेळ हा सण, यात्रा- उत्सव, लग्न समारंभाचा असतो. यामुळे प्रत्येकजण अशा कार्यक्रमांचा भाग होतो. यामुळे वेळेचे नियोजन कोलमडते. यासाठी ‘बेळगाव लाईव्ह’तर्फे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे कि, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आतापासूनच विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे वळावे.
वेळेचे नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, योग्य आणि संतुलित आहार, व्यायाम, शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्य या साऱ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करुन परीक्षेला सामोरे जावे. अभ्यासाचा अतिरिक्त ताण न घेता सकारात्मक विचार करुन अभ्यासाचे योग्य नियोजन करावे. आणि पुढील आयुष्य सुखकर बनविण्यासाठी आतापासूनच अभ्यासासाठी मेहनत घ्यावी.