बेळगाव लाईव्ह : राजकारणी मंडळी राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पक्षांतर्गत, राजकीय, सामाजिक, वैयक्तिक पातळीवरील टीकाटिप्पण्या राजकारणात खपवून घेतल्या जातात. मात्र, राजकारणासाठी एखाद्या विद्येच्या मंदिरावर जर कुणी बोट दाखवत असेल तर अशा व्यक्तीच्या वैचारिक पातळीची कल्पनाच न केलेली बरी!
आज ग्रामीण भागात एका सभेत बोलताना ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी जाहीरपणे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती महाविद्यालयाकडे बोट करून दाखविले. सीमाभागात हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि भविष्य घडविणाऱ्या या संस्थेकडे राजकीय हेतूपोटी स्वार्थाने बोट करून दाखविणे हे अत्यंत चुकीचे आहे.
आजवर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा- महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक जीवन उंचावले आहे. सीमाभागात शेकडो शैक्षणिक संस्था दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ चालवत आहे. मराठी भाषिकांचे सीमाभागातील काही मानबिंदू आहेत. आणि या मानबिंदूंपैकीच असलेली एक संस्था म्हणजे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ! एका जाहीर सभेत अशा संस्थेविषयी ‘उचलली जीभ, अन लावली टाळ्याला’ अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या आणि एका जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून असे विधान येणे म्हणजे अशोभनीय आहे.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातून शिक्षण घेतलेल्या नागरिकांची सीमाभागातील तिसरी पिढी आहे. बहुतांशी लोकप्रतिनिधींनीही या शिक्षण संस्थेमार्फत आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अनेकांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. सीमाभागातील मराठी भाषिक आयएएस अधिकारी पदापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचविणाऱ्या यादीत या संस्थेचा समावेश आहे.
सीमालढ्यातील अनेक नेतेमंडळींनीही याच शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतले आहे. केवळ शिक्षणच नव्हे तर शिक्षणाव्यतिरिक्तही या संस्थेने विविध क्षेत्रात योगदान दिलं आहे. आज बेळगावमधील अनेक खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये लाखोंच्या घरात डोनेशनच्या स्वरूपात पैसे भरावे लागतात. भरमसाट फी मुळे अनेक पालक मेटाकुटीला येतात. मात्र ग्रामीण आमदारांना केवळ याच शैक्षणिक संस्थेबद्दल आकसपूर्वक विधान का करावे लागले? यामागे त्यांचा काही राजकीय हेतू आहे? कि या माध्यमातून त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे? कि या संस्थेबद्दल माहिती नसतानाच उचलली जीभ अन लावली टाळ्याला असा प्रकार त्यांनी केला याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
आमदार आक्कांनी केलेल्या या विधानानंतर ज्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे अशा अनेक मराठी तरुण-तरुणींनी या विधानाचा सोशल मीडियावरून जाहीर निषेध केला आहे. या संस्थेत केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिक विद्यार्थीही प्राधान्याने शिक्षण घेतात. मात्र, ग्रामीण आमदारांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एक नवा वाद त्यांनी स्वतःवर ओढवून घेतला आहे. त्यांच्या या विधानानंतर सीमाभागातील हजारो तरुण-तरुणींनी फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून ग्रामीण आमदारांचा निषेध नोंदवत अशा मराठी संस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे नमूद केले आहे.
सीमाभागातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळासारख्या मराठी संस्था सीमाभागाचा आत्मा आहेत. त्यामुळे अशा संस्थांच्या मुळावर उठलेल्या लोकांना मुळासकट उपटण्याची तयारीही मराठी युवापिढीने दर्शविली आहे.
This is outcome of loosing self respect by Marathi people. They never united and due advantage is taken by outsiders settled in Belgaum.
so long as there is no unity and self respect among Marathi people, they will be crushed with demoralization and will be treated like slaves by outsiders.