बेळगाव लाईव्ह विशेष : घरबसल्या प्रत्येक गोष्टीची सफर करवून आणणारे साधन म्हणजे मोबाईल. प्रत्येकाच्या हातातील खेळण्याप्रमाणे रुळलेल्या मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहजसोप्या झाल्या आहेत. सातासमुद्राची सफर करून आणणाऱ्या मोबाईलमध्ये कोणत्याही ठिकाणी घडणाऱ्या घटना चुटकीसरशी आज उपलब्ध झाल्या असून बेळगावमधील नागरिकांनाही घरबसल्या आपल्या मोबाईलवर विविध कार्यक्रम व सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे, अशी आशा होती. बेळगावमधील क्रीडाप्रेमींना आनंद मिळवून देण्यासाठी खेळाच्या मैदानावरून थेट मोबाईलवर प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याचे काम मच्छे येथील गजानन जैनोजी यांनी केले आहे.
राज्य आणि राष्ट्रपातळीवर होणाऱ्या खेळांचे प्रक्षेपण साहसासहजी उपलब्ध होऊ शकते मात्र शहर-गाव मर्यादित खेळ असोत किंवा कार्यक्रम हे मोबाईलवर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून उपलब्ध होणे तशी अवघड गोष्ट आहे. बेळगावमध्ये अनेक क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजिले जातात. अशा कार्यक्रमांचे रेकॉर्ड केलेले व्हिडीओ पाहता येतात. मात्र थेट प्रक्षेपण उपलब्ध होऊ शकत नाही. बेळगावमधील कार्यक्रमदेखील घरबसल्या मोबाईलवर पाहता यावेत यासाठी गजानन जैनोजी यांनी प्रयत्न करून २०२१ मध्ये ‘स्पोर्ट्स ऑन’ला या चॅनलची सुरुवात केली.
मच्छे गावात जन्मलेल्या गजानन जैनोजी यांचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण ठळकवाडी हायस्कूलमध्ये झाले. तर महाविद्यालईन शिक्षण जैन महाविद्यालय, बेळगाव येथे झाले. लहानपणापासून त्यांना क्रिकेटची आवड असल्याने गावात आपल्या मित्रांसोबतच त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले. त्यांच्या क्रिकेटच्या तंत्रात सुधारणा झाल्यानंतर त्यांनी रणजीपटू मिलिंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटबाबत पुढील प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षकांनी दिलेल्या कानमंत्रांचा वापर करून तंत्रशुद्ध खेळाला सुरुवात केली. त्याचा फायदा त्यांना जैन महाविद्यालय संघात क्रिकेट खेळताना झाला. क्रिकेट खेळता खेळता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक कार्यातहि स्वतःला झोकून दिले. जैनोजी यांच्या कार्यकौशल्यामुळे अल्पावधीतच ते नावलौकिकास आले.
टीव्हीवरील आंतरराष्ट्रीय सामन्यांचे प्रक्षेपण पाहून गजानन जैनोजी यांनी स्थानिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे प्रक्षेपण करण्याचे ध्येय मनात बाळगून, प्रारंभी स्थानिक विभागात प्रयोग करून पडताळणी करून पाहिली. यामध्ये यश मिळाल्यानंतर २०२२ मध्ये बेळगाव प्रिमिअर लीग स्पर्धेत ‘स्पोर्ट्स ऑन’च्या नावाने संघ खरेदी केला. बेळगावमध्ये सुरुवातीला मोजक्या क्रीडा स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जायचे. पण, आज ‘स्पोर्ट्स ऑन’च्या माध्यमातून २५ ते ३० स्पर्धाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे.
आतापर्यंत ‘स्पोर्ट्स ऑन’च्या माध्यमातून देशभरातील ८० हून अधिक स्पर्धांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ‘स्पोर्ट्स ऑन’च्या माध्यमातून बेळगावातील स्पर्धा, सामने जागतिक पातळीवर पोहोचवले. ‘स्पोर्ट्स ऑन’च्या माध्यमातून बेळगाव, कोल्हापूर, इचलकरंजी, हुबळी, धारवाड, गोवा, बेंगळूर, पुणे आदी ठिकाणी भरविल्या जाणाऱ्या स्पर्धांचे यशस्वी थेट प्रक्षेपण केले आहे. बेळगाव शहरातील महत्वाच्या मोठ्या स्पर्धांचे यशस्वी थेट प्रक्षेपण करून बेळगाव प्रिमियर लीग, साईराज चषक, निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा, श्री चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, गणेश श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव आदी स्पर्धांचे प्रेक्षपण करून थेट प्रक्षेपणाच्या क्षेत्रात आपला पाया रोवला.
बेळगावमधील ऐतिहासिक मैदानांवर पार पडलेल्या अनेक स्पर्धांचे थेट प्रक्षेपण सर्वप्रथम गजानन जैनोजी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्पोर्ट्स ऑन’वर केले गेले. सुभाषचंद्र बोस -लेले मैदान, व्हॅक्सिन डेपो मैदान, सरदार्स हायस्कूल मैदान व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी त्यांती थेट प्रक्षेपण करुन लोकांपर्यंत ‘लाईव्ह’ सामने प्रसारित करून क्रीडा व सामाजिक कार्याला प्रारंभ केला. इतकेच नव्हे तर गजानन जैनोजी यांनी २०१२ पासून मच्छे क्रिकेट क्लबची स्थापना करून यशस्वी वाटचाल चालवलेली आहे. मच्छे येथे घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धा व शरीरसौष्ठव स्पर्धांचे प्रक्षेपण करून घरबसल्या स्थानिक नागरिकांना सामने पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. मच्छे चषक स्पर्धेत कर्नाटकातील ग्रामीण विभागातून होणाऱ्या सर्वात मोठ्या हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे सलग चार वर्षे गजानन जैनोजी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आयोजन केले. महिलांसाठी विशेष सामन्यांचे आयोजन केले.
सध्या बेळगावमधील सरदार्स मैदानावर सुरु असलेल्या ‘आम. अनिल बेनके नॅशनल लेव्हल टेनिस बॉल क्रिकेट’ स्पर्धेचे थेट प्रक्षेपणदेखील स्पोर्ट्स ऑन चॅनलच्या माध्यमातून करण्यात येत असून गजानन जैनोजी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १ लाख ८० हजार लोकांपर्यंत थेट प्रक्षेपण पोहोचविण्यात येत आहे. गजानन जैनोजी यांच्या माध्यमातून होत असलेल्या थेट प्रक्षेपणामुळे त्यांना बेळगावमध्ये ‘थर्ड अंपायर’ म्हटले जात आहे. स्थानिक खेळ घरबसल्या आपल्या मोबाईलवर यु-ट्यूबच्या माध्यमातून पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने बहुतांशी मैदान आज रिकामी दिसत आहेत. मात्र घरबसल्या थेट प्रक्षेपण उपलब्ध करून दिल्याने क्रीडाप्रेमींमध्ये गजानन जैनोजी यांचे कौतुक होत आहे.