बेळगाव -बागलकोट रोडवरील निलजी ग्रामपंचायत हद्दीतील शिंदोळी क्रॉसचे केलेले ‘कुबेर सर्कल’ हे नामांतर अधिकृत नसल्याचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
शिंदोळी क्रॉस येथे अलीकडे 23 जानेवारी रोजी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील आदींच्या उपस्थितीत शिंदोळी क्रॉसचे नामांतर करत त्याला ‘कुबेर सर्कल’ असे नांव देण्यात आले होते.
सदर नामकरण हे एका वाईन शॉपच्या नावावरून करण्यात आल्यामुळे जनतेमध्ये देखील रोष होता. अनेकांनी कोणत्या आदेशान्वये हा फलक लावला आहे याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले होते. शिंदोळी क्रॉसची अर्धी हद्द महापालिकेत तर अन्य अर्धी हद्द निलजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येते त्यामुळे महापालिकेच्या नावाने या ठिकाणी नामांतराचा फलक लावून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
यासंदर्भात बोलताना जिल्हा पालकमंत्री कारजोळ यांनी आपणाला याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. मात्र आता तो फलक काढला जाईल, असे सांगितले आहे.
त्यावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी देखील फलक काढण्याची सूचना महापालिकेला केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.