Thursday, November 28, 2024

/

पानिपत -करनाल येथे ‘शौर्य दिन’ झाला साजरा

 belgaum

जगप्रसिद्ध पानिपतच्या तिसऱ्या लढाईत शहीद झालेल्या आपल्या वीर मराठा पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बस्ताडा पानिपत -करनाल (हरियाणा) येथे आज शनिवारी ‘शौर्य दिन’ साजरा करण्यात आला. या समारंभास बेळगावच्या समस्त मराठा बांधवांतर्फे शिवसंत संजय मोरे यांनी आवर्जून हजेरी लावली होती.

पानिपत -करनाल येथील अ. भा. मराठा जागृती मंचने बस्ताडा येथे आज शनिवारी या दिमाखदार शौर्य दिन समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मराठा जागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांसह मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मराठा राजघराण्यांचे सदस्य, राजकीय नेते, व्यावसायिक, उद्योजक आणि स्थानिक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शौर्य दिन सोहळ्यास बेळगावचे शिवसंत संजय मोरे हे देखील उपस्थित होते. आयोजकांतर्फे त्यांचे अगत्यपूर्ण स्वागत करण्यात आले. समारंभात बोलताना शिवसंत संजय मोरे यांनी बेळगावच्या समस्त मराठा समाज बांधवांच्यावतीने प्रभावी विचार व्यक्त केले. शौर्य दिनाचे औचित्य साधून शिवसंत संजय मोरे यांनी आयोजक प्रमुखांना स्मृतिचिन्हा दाखल छ. शिवाजी महाराज यांची राजमुद्रा बसवलेली अंगठी भेटीदाखल दिली. अंगठीच्या स्वरूपात शिवरायांची अतिशय पावन राजमुद्रा भेट देण्याच्या शिवसंत मोरे यांच्या कृतीबद्दल अ. भा. मराठा जागृती मंचच्यावतीने सूत्रसंचालकांनी प्रशंसोद्गार काढले.Karnal

बस्ताडा पानिपत -करनाल (हरियाणा) येथील आजच्या आपल्या भेटीप्रसंगी शिवसंत संजय मोरे यांनी तेथील स्थानिक मराठा समाज बांधव व मराठा नेत्यांशी संवाद साधून विचारांची अदानप्रदान केली. तसेच कुरुक्षेत्र अर्थात पानिपत रणभूमीतील शिवस्मारक व इतर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.

भारतावर 14 जानेवारी 1761 रोजी हल्ला करणाऱ्या अफगाणच्या अब्दुलशाह अब्दाली याच्या विरुद्ध मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. जे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

या युद्धात मातृभूमीच्या संरक्षणार्थ हजारो मराठा योध्यांनी वीरमरण स्वीकारले. तेंव्हापासून त्या वीर योद्धांचा वंशज असलेला रोड समाज आज देखील कुरुक्षेत्र (पानिपत) येथे अस्तित्वात आहे. या समाजाच्या मराठा जागृती मंचतर्फे दरवर्षी 14 जानेवारी रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात शहीद झालेल्या मराठा योद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शौर्य दिन समारंभाचे आयोजन केले जाते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.