भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) ट्रेनिंग कमांडचे एअर कमांडिंग -इन -चीफ म्हणून गेल्या 1 जानेवारी 2023 पासून अधिकार पदाची सूत्रे हाती घेतलेल्या एअरमार्शल राधाकृष्णन राधीश यांनी आपली पहिली भेट बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला दिली आहे.
आयएएफ ट्रेनिंग कमांडचे नवे एअर कमांडिंग -इन -चीफ एअरमार्शल राधाकृष्णन राधीश यांनी आज मंगळवारी सकाळी सांबरा बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट दिली. यावेळी ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर एअरमार्शल राधीश यांना आकर्षक गार्ड ऑफ ऑनरद्वारे मानवंदना देण्यात आली.
आजच्या भेटीप्रसंगी एअरमार्शल राधाकृष्णन राधीश यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या ठिकाणी असलेल्या विविध प्रशिक्षण सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांना सध्या ट्रेनिंग स्कूलच्या ठिकाणी गेल्या 30 डिसेंबरपासून सुरू असलेल्या अग्नीवीरवायू पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात आली. तेंव्हा एअर मार्शलनी बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलची कार्यक्षम प्रेरणा आणि 3000 अग्नीवीरवायू प्रशिक्षणार्थींच्या यशस्वी नांवनोंदणी प्रक्रियेबद्दल ट्रेनिंग स्कूलचे अभिनंदन केले.
नव्याने भरती झालेल्या अग्नीवीरवायू प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना एअर मार्शल राधीश यांनी त्यांना कठीण परिश्रमाद्वारे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बळकट बनवून हवाई दलातील नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रेरित केले.
अग्नीवीरवायू प्रशिक्षणार्थींना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणाची अत्याधुनिक हायटेक उपकरणे आणि पायाभूत सुविधांच्या व्यापक वापराचे महत्त्व एअरमार्शल राधाकृष्णन राधाेश यांनी यावेळी विशद केले.