बेळगाव लाईव्ह : आम. अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून आणि बेळगाव मधील तमाम शिवसैनिकांच्या सहकार्यातून बेळगाव मधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे.
हे काम आता पूर्णत्वास आले असून शनिवार दि. 28 जानेवारी 2023 रोजी सुशोभीकरण करण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने उर्वरित कामकाज युद्ध पातळीवर आहे.
गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 रोजी स्मारक परिसरात आदिशक्ती तुळजाभवानी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. याचबरोबर स्मारक परिसर देखील आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला असून आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आणि विधिवत पूजा करण्यात आले.
आमदार अनिल बेनके यांच्यासह विविध शिवसैनिकांच्या उपस्थितीत आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. शनिवार दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास भारत सरकारचे माहिती आयुक्त आणि जेष्ठ पत्रकार श्रीमंत उदय माहूरकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
स्वागताध्यक्ष आमदार अनिल बेनके यांच्यासह सेवानिवृत्त लेफ्टनंट जर्नल दिलीप देसाई, बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील, गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ भारतीय स्वामीजी, रामनाथ गिरी मठ नूल गडहिंग्लज येथील भगवानगिरी महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास बेळगाव मधील तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज सुशोभीकरण स्मारक समिती आणि आमदार अनिल बेनके यांच्या वतीने करण्यात आले आहे.