बेळगाव- रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने यंदाही आयोजित करण्यात आलेल्या “अन्नोत्सव” या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी अंगडी कॉलेज मैदान, नानावाडी येथे संपन्न झाले.
सहा ते पंधरा जानेवारीपर्यंत रोज सायंकाळी साडेपाच ते रात्रो साडेदहापर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचे उद्घाटन बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांनी यावेळी फीत सोडून आणि दीप प्रज्वलन करून केले. पाहुणे म्हणून रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. व्यंकटेश उर्फ बबन देशपांडे हे उपस्थित होते.
“सर्वांना देशभरात फिरता येणे अशक्य आहे त्यामुळे बेळगाव शहरात अशा प्रकारच्या उत्सवाचे आयोजन करून देशभरातील विविध राज्यातील चवी बेळगावकरांना रोटरी क्लबने उपलब्ध करून दिल्या आहेत ऐसे सांगून खासदार मंगला अंगडी यांनी समाधान व्यक्त केले. “रोटरी क्लबने गेल्या पंचवीस वर्षापासून हा उपक्रम राबवला असून यातून मिळणारा पैसा ते समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार आहेत ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे असेही श्रीमती अंगडी म्हणाल्या.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष रो. बसवराज विभूती यांच्या स्वागताने झाली .खासदार व पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय माजी अध्यक्ष शरद यांनी करून दिला.इवेंट बाबतची माहिती इव्हेंट चेअरमन श्री पराग भंडारे यांनी करून दिली. “1997 पासून बेळगावात या उत्सवाची सुरुवात झाली असून दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदा सुरू झालेला हा उत्सव 2020 पेक्षा फार मोठा आहे.यंदा 130 जेवणाचे आणि 70 ग्राहक उपयोगी स्टॉल्स आहेत .ज्यामध्ये देशाच्या विविध भागातून आलेल्या स्टॉलचा समावेश आहे. आजवर रोटरी क्लब ने देशभरात आयोजित केलेल्या कोणत्याही अशा इव्हेंटपेक्षा हा मोठा इव्हेंट असून यातून मिळणारा निधी हा बेळगाव शहराच्या विकासासाठी खर्च करणार आहोत “अशी माहितीही भंडारे यांनी दिली.
येथे दहा दिवसात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये गायन, डान्स आणि मिसेस बेळगाव सुपर वुमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. असेही ते म्हणाले यावर्षी या उत्सवात दोन लाखाहून अधिक नागरिक भेट देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी व्यासपीठावर या उपक्रमाचे प्रायोजक अरिहंत हॉस्पिटलचे डॉ. माधव दीक्षित, इंडस अल्टम स्कूलचे कर्नल श्याम विजयसिंह, केमकोचे वैभव सारंगा हेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना रो. वेंकटेश देशपांडे म्हणाले की, अशा प्रदर्शनाचे तीन उद्देश असतात त्यामध्ये स्टॉल ओनर्स आपल्या वस्तूचे प्रदर्शन करतात, ग्राहकांना चांगल्या पदार्थांची चव चाखता येते. आणि रोटरी सारख्या संस्थेला मिळणारा पैसा समाजासाठी उपयोगी करता येतो.सेक्रेटरी रो. अक्षय कुलकर्णी यांनी काही महत्त्वाची माहिती दिल्यानंतर रो. योगेश कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने सांगता झाली .याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अभियंता बकुल जोशी यांच्यासह मुकेश बंग ,जयदीप सिद्धनावर ,नितीन पुजार, मनोज पै ,शरद पै, तुषार कुलकर्णी, मनोज
हुईलगोळ, सुहास चांडक, उमेश सरनोबत, आनंद सराफ, नितीन शिरगुरकर, मिलिंद पाटणकर, राजीव पोतदार, डॉ. श्रीधर शेट्टी, डॉ. विजय देसाई, अनिश मेत्रानी, जीवन खटाव, प्रमोद अग्रवाल व अल्पेश जैन हे रोटेरियन्स विशेष परिश्रम घेत आहेत.