बेळगाव लाईव्ह : दैनंदिन आयुष्यातून विरंगुळा आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. याच अनुषंगाने बेळगावकर खवय्यांसाठीही अन्नोत्सवाच्या माध्यमातून विशेष पर्वणी उपलब्ध करून देण्यात येते. मागील २ वर्षात कोविडमुळे अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यंदा दरवर्षीपेक्षा भव्य प्रमाणात अन्नोत्सव आयोजित करण्यात आला होता.
केवळ खाद्यपर्वणीच नाही तर महिलांसाठी विविध स्पर्धा आणि अन्नोत्सवाला भेट देणाऱ्या येणाऱ्या नागरिकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या अन्नोत्सवात ‘मिसेस बेळगाव’ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अमृता रायबागी यांनी बहुमान पटकावला. या कार्यक्रमास ‘मिसेस गॅलॅक्सी’ ‘चाहत दलाल’ या उपस्थित होत्या. विजेत्या स्पर्धकाला चाहत दलाल यांच्याहस्ते मिसेस बेळगावचा मानाचा मुकुट बहाल करण्यात आला. यावेळी मिसेस बेळगाव किताबाच्या मानकरी ठरलेल्या अमृता रायबागी यांनी रोटरीने उपलबध करून दिलेल्या संधीचे कौतुक केले.
रोटरीच्या वतीने आयोजिण्यात येणार अन्नोत्सव बेळगावसह संपूर्ण उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध झाला आहे. दरवर्षी हजारो नागरिक अन्नोत्सवाचा आस्वाद लुटण्यासाठी येतात. किंबहुना अन्नोत्सव आयोजिण्यात येण्याची प्रतीक्षा करतात. दरवर्षी सीपीएड मैदानावर भरणारा अन्नोत्सव यंदा अंगडी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला असून अन्नोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांची उत्तम सोय रोटरी व्यवस्थापनाने केली आहे. रविवारी अन्नोत्सवाचा समारोप होणार असून गेले ८ दिवस अन्नोत्सवाला हजारो खवय्यांनी भेट दिली आहे.
शनिवार दि. १४ जानेवारी रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा तसेच फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. फॅशन शो कार्यक्रमास मिसेस गॅलॅक्सी चाहत दलाल, आम. अभय पाटील, अभिनेत्री सई लोकूर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी चाहत दलाल यांनी रोटरी कडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी रोटरीचे पदाधिकारी मनोज मायकल यांनी रोटरी कडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. अन्नोत्सवाच्या माध्यमातून जमा झालेला निधी विविध समाजाभिमुख उपक्रमांसाठी वापरण्यात येतो, या माध्यमातून आजवर अनेक गरजूंना मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.