बेळगाव : ६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या रेणुकादेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी परिवहन, तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन विविध सूचना करण्यात आल्या.या बैठकीत परिवहन अधिकारी, तहसीलदार यांच्याशी प्रत्येक्षपणे आणि पोलीस अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा पोलिसप्रमुखांनी संवाद साधला.
सौंदत्ती यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याकडून खबरदारी घेतली जात आहे. यात्रा शांततेत पार पडावी यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
याचबरोबर पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी परिवहनचे नियंत्रक लमाणी, चिकोडीचे तहसीलदार, रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी आणि सौंदत्ती पोलीस निरीक्षकांबरोबर चर्चा केली.
३ ते १० जानेवारी या काळात हि यात्रा चालणार असून या काळात मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी बस रवाना होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी २ जानेवारीपासूनच अतिरिक्त बसची सोय करण्यात यावी. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात ७८ हजार तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात ७५ हजार पासधारक विद्यार्थी आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी परिवहन अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनीही सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.