बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून घालण्यात आलेला रिंगरोडचा घाट रद्द करेपर्यंत शेतकरी स्वस्थ बसणार नाही. यासाठी झाडशहापूर येथे सोमवार दि. २३ रोजी सकाळी १०.०० वा. रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी तालुका म. ए. समितीने बैठक घेऊन जागृती केली. या बैठकीत येत्या काळात रिंगरोडविरोधात तालुका म. ए. समितीकडून परिसरातील गावांतून जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीत बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, रिंगरोडमुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत येणार आहे. असंख्य शेतकरी रस्त्यावर येणार आहेत. सरकारचा हा प्रयत्न योग्य नसून याला कडाडून विरोध करण्यात येईल शिवाय प्रस्ताव पूर्णपणे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी आर. आय. पाटील बोलताना म्हणाले, शेतीवर शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांनी संघटित राहावे, असे आवाहन त यांनी केले.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनीही उपस्थितांना संबोधित करत, मराठी भाषिकांना देशोधडीला लावण्यासाठीच हा प्रकल्प राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांनी सावध होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी युवा नेते आर. एम. चौगुले, भागोजी पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. एम. जी. पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला देसूर ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी पिरनवाडी, दत्ता उघाडे, पुंडलिक पावशे, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, मल्लाप्पा गोरल, नागेश सावंत, नारायण होसूरकर, अशोक कोलकार, मनोज पिरनवाडी, तुकाराम गोरल, पार्वती बेळगावकर, भरमा सुतार, नारायण मयेकर आदींसह गावकरी उपस्थित होते.