बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये उभारण्यात आलेले ‘जय किसान’ या खाजगी भाजी मार्केट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. लवकरच या भाजी मार्केटची वर्षपूर्ती होत असून, वर्षपूर्तीच्या तोंडावर जय किसान भाजी मार्केटसाठी नवी समस्या निर्माण झाली आहे.
या भाजी मार्केटमध्ये येणारे खरेदीदार आणि विक्रीदार यांच्या वाहनाला प्रवेश शुल्क आकारण्यात आल्याने आज सकाळी काहीसा गोंधळ निर्माण झाला. यानंतर आज जय किसान भाजी मार्केट तात्पुरते बंद करण्यात आले. भाजी मार्केटच्या उदघाटनापूर्वीच सुरु झालेला वाद वर्षपूर्ती होत आली तरी संपुष्टात येत नसून आता नव्या समस्येमुळे पुन्हा या भाजी मार्केटसमोर नवा पेच उभारला आहे.
या भाजी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा होत असून यासह इतर गोष्टींच्या देखभालीसाठी होत असलेला अतिरिक्त खर्च आटोक्यात आणण्यासाठी भाजी मार्केटने वाहनांसाठी प्रवेश शुल्क आकारण्याचे ठरविले. यानुसार आजपासून याची अंमलबजावणी करण्यात आली.
मात्र काही वाहनचालकांनी प्रवेश शुल्क देण्यास नकार दिल्याने काही काळ वादावादी घडली. मात्र भाजी मार्केट व्यवस्थापनाने प्रवेश शुल्काची आकारणी हि भाजी मार्केटच्या तत्सम देखभालीसाठी आकारण्याचे ठरविले. यापूर्वी कॅंटोन्मेंट परिसरात देखील प्रवेश शुल्क आकारण्यात येत होते.
गेल्या वर्षभरात प्रवेश शुल्क आकारण्याबाबत व्यवस्थापनाने हालचाल सुरु केली होती. मात्र आजपासून याची अंमलबजावणी करण्यात आली, मात्र यावेळी काहींनी विरोध दर्शविल्याने भाजी मार्केटसंदर्भात नवा वाद समोर आला आहे.
या वादाला राजकीय वळण देण्यात येत असल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली असून वर्षपूर्ती होण्या आधीच पुन्हा नवा पेच जय किसान भाजी मार्केटसमोर उभारल्याने आता यातून वाट काढून पुन्हा भाजी मार्केट सुरळीतपणे चालविण्याचे व्यवस्थापनासमोर प्रश्नचिन्ह उभारले आहे.