बेळगाव : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अलीकडे ऐरणीवर आला असून या अंतर्गत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारी तसेच खाजगी स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
बेळगावमध्ये अलीकडे ‘पिंक ऑटो’ हा उपक्रम देखील सुरु करण्यात आला असून आता महिलांसाठी खास ‘पिंक बस’ सुविधा सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
सौरभ सावंत यांनी सदर प्रस्ताव मांडला असून महिला प्रवाशांसाठी ‘पिंक बस’ सुविधा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, परिवहन आणि समाजकल्याण मंत्री बी. श्रीरामुलू तसेच बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
पिंक बस योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, आणि लवकरच हि सेवा बेळगाव शहरात सुरु होईल, असे आश्वासन मान्यवरांनी दिले असून यासाठी आमदार अनिल बेनके आणि ऍड. धन्यकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.