बेळगाव लाईव्ह : महानगरपालिका निवडणुकीला 17 महिने उलटून देखील अद्याप महापौर-उपमहापौर निवडणुका घेण्यात आल्या नसून याबाबत नगरसेवकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
अखेर कर्नाटक सरकारने महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर केली असून बेळगाव महानगरपालिकेसाठी महापौरपदी सामान्य महिला तर उपमहापौरपदी ओबीसी ब वर्ग असे आरक्षण जाहीर केले आहे.
यामुळे महानगरपालिकेवर महापौर आणि उपमहापौर पदावर महिला नगरसेवकांचीच वर्णी लागणार असून मनपाचा कारभार दोन महिला नगरसेवकांच्या हाती येणार हे निश्चित आहे.
17 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर महापौर -उपमहापौर निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली नाही.
या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ हे काम पाहणार आहेत. या निवडणुकीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर होईल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ यांची बुधवारी काही नगरसेवकांनी तसेच आमदारांनी भेट घेतली असून लवकरात लवकर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बेळगाव महानगरपालिका महापौर उपमहापौर निवडणूक व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.