आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या सिमाप्रश्नाला बळ मिळावी या उद्देशाने शिवसैनिकांना शिवबंधन बांधून त्यांच्या हाती मशाल देण्याचे काम शिवसेना उद्धव ठाकरे बेळगावच्यावतीने केले जाणार आहे. त्यासाठी येत्या मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी प्रतिज्ञा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील टिळक चौक येथे येत्या मंगळवारी दुपारी 4 वाजता होणाऱ्या प्रतिज्ञा दिनाच्या भव्य मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून शिवसैनिक कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेची शपथ देवविण्याद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल त्यांच्या हाती सुपूर्द केली जाणार आहे.
या मेळाव्यास शहरातील असंख्य शिवसैनिक येणार असल्याचा दावा तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले आपल्या पदाचे दुरूपयोग करत असून त्यांच्याकडून त्या पदानुसार पक्षासाठी कोणतेच कार्य केले जात नाही. त्यामुळे सिमाभागातील शिव सेनेची असून नसल्यासारखी गत झालेली आहे.
त्यामुळे बेळगाव शिवसेनेतील मार्ग दूर करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे ‘प्रतिज्ञादिना’ने निष्क्रिय जिल्हाप्रमुखांना उत्तर देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सदर मेळावा फक्त शिवसैनिकांसाठी असल्याचे सचिन गोरले यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिज्ञा दिनासाठी गटप्रमुखांपर्यंतच्या सर्व पदाधिकार्यांना निमंत्रण नाही. सदर प्रतिज्ञा दिन मेळाव्यास बेळगाव शहरासह बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यातील शिवसैनिकही येणार असल्याचे गोरले यांनी सांगितले. प्रतिज्ञा दिन कार्यक्रमाला तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्यासह बेळगाव उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, आकाश डुकरे, बंडू केरवाडकर यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत.
जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्तिथ राहणार आहेत. या कार्यक्रमात देण्यात येणार्या शिवबंधनाचे पावित्र्य शिवसैनिक जपतील आणि त्यांच्या हाती शिवसेनेची मशाल व भगवा असेल, असा विश्वास उपशहर प्रमुख राजू तुडयेकर यांनी व्यक्त केला आहे.