जगप्रसिद्ध पानिपतच्या तिसऱ्या लढाईत शहीद झालेल्या आपल्या वीर मराठा पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी बसताडा पानिपत -करनाल (हरियाणा) येथे शौर्य दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या समारंभात बेळगाव शहर परिसरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसंत संजय मोरे यांनी केले आहे.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील शहीद मराठा युद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या समारंभासंदर्भात पानिपत -करनाल येथील मराठा जागृती मंचने पत्राद्वारे दिलेल्या निमंत्रणावरून शिवसंत संजय मोरे यांनी उपरोक्त आवाहन केले आहे.
फार पूर्वी 14 जानेवारी 1761 रोजी भारतावर हल्ला करणाऱ्या अफगाणच्या अब्दुलशाह अब्दाली याच्या विरुद्ध मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. जे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धात मातृभूमीच्या संरक्षणार्थ हजारो मराठा योध्यांनी वीरमरण स्वीकारले. तेंव्हापासून त्या वीर योद्धांचा वंशज असलेला रोड समाज आज देखील कुरुक्षेत्र अर्थात पानिपत येथे अस्तित्वात आहे.
या समाजाच्या मराठा जागृती मंचतर्फे दरवर्षी 14 जानेवारी रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात शहीद झालेल्या मराठा योद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शौर्य दिन समारंभाचे आयोजन केले जाते. पानिपतचे तिसरे युद्ध इतके भयंकर झाले, मराठा योध्यांनी इतका मोठा पराक्रम दाखविला की त्यानंतर अनेक दशकं विदेशी हल्लेखोरांची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. पानिपत -करनाल येथे 2012 साली झालेल्या या शौर्यदिन समारंभास माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभादेवी पाटील यांनी खास उपस्थिती दर्शविली होती.
सदर समारंभाचे महत्त्व कालपरत्वे वाढत असून आणि मराठा समाज बांधवांसह देश विदेशातील मराठी बांधव या समारंभात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यामध्ये सर्वसामान्यांसह मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मराठा राजघराण्यांचे सदस्य, राजकीय नेते, व्यावसायिक आणि उद्योजकांचा समावेश असतो.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात देशासाठी बलिदान देणाऱ्या मराठा योद्धाना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी बसताडा पानिपत -करनाल (हरियाणा) येथे आयोजित केला आहे. या समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण शिवसंत संजय मोरे यांना मिळाले असून समस्त मराठा समाज बांधवांना या समारंभ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.