बेळगाव लाईव्ह : तब्बल 17 महिन्यानंतर बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या 6 फेब्रुवारी रोजी सदर निवडणूक पार पडणार आहे.
या निवडणुकीसाठी सर्व नगरसेवकांना अधिसूचनेनुसार नोटीस जारी करण्यात आली आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयातून सदर नोटीस जारी करण्यात आली असून या नोटीसित सरकारी अधिसूचनेनुसार निर्देश देण्यात आले आहेत. 21व्या आरक्षणा नुसार घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीत महापौर पद सामान्य महिला आणि उपमहापौर पद ओबीसी महिला या वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
प्रादेशिक आयुक्तांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सदर निवडणूक 6 फेब्रुवारी रोजी होणार असून सकाळी १० वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. निवडणूक सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित राहण्याची सूचना नोटीसित देण्यात आली आहे
6 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता सभेचे कामकाज सुरू होणार आहे. यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी, क्रमवारीनुसार नामनिर्देशन पत्रांची घोषणा, उमेदवारी मागे घेणे, बिनविरोध निवडणूक झाल्यास निकाल जाहीर करणे किंवा निवडणूक घेणे आवश्यक असल्यास प्रक्रिया पूर्ण करून सदस्यांची स्वाक्षरी घेऊन निकाल जाहीर करणे असे या निवडणुकीचे स्वरूप आहे.
सरकारी अधिसूचनेनुसार महापौर आणि उपमहापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांकडून प्रमाणपत्र घेऊन सादर करावे. तसेच निवडणुकीच्या नियमानुसार आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. यासह इतर अनेक सूचना नगरसेवकांना जारी करण्यात आलेल्या नोटीसित देण्यात आल्या आहेत.
सव्वा वर्षाहून अधिक काळ महानगरपालिकेचे सभागृह महापौर-उपमहापौरांच्या निवडीमुळे वंचित होते. मात्र अखेर महापौर-उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून येत्या 6 फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिकेवर महापौर-उपमहापौर निवडले जाणार आहेत.
सकाळी 10 पासूनच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून 3 वाजता प्रत्यक्ष मतदान होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. तसेच आवाजी मतदानाने ही निवडणूक पार पडणार आहे.