बेळगाव लाईव्ह : निपाणी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पीएसआय अनिलकुमार कुंबर यांच्या नावे एका भामट्याने बनावट इन्स्टा आयडी बनवला आहे. याविरोधात अनिलकुमार कुम्बर यांनी सीईएन गुन्हे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
या बनावट आयडीवरून सुरु असलेल्या इन्स्टा अकाउंटचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या अकाऊंटवरून फोटोंचा गैरवापर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
याप्रकरणी बेळगाव जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी.आर. गड्डेकर यांनी सखोल तपास केला. त्यानंतर बनावट इंस्टाग्राम अकाऊंड उघडून गैरवापर केल्याप्रकरणी आरोपी विजयकुमार बराली (वय 28 रा. अथणी) याला अटक करून चौकशी केली.
चौकशी दरम्यान पीएसआयच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून 1,12,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स बनवून पीएसआय असल्याचे सांगून अधिकाधिक लोकांशी मैत्री केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. 50 हून अधिक महिलांना नोकरी व इतर आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून 4 लाख रुपये उकळले असल्याची धक्कादायक बाबदेखील समोर आली आहे.
याचप्रमाणे आरोपीने असे आणखी नऊ बनावट इंस्टाग्राम आयडी तयार केले असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. सदर आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत पीएसआय एच.एल. धर्मट्टी, एएसआय ए.एच.भजंत्री, के.आर. इमामवार, जी.एस.लमाणी, एस.आय.भांडी, एन.आर.घडेप्पानवर,एराण्णा अनिताहल्ली, आणि श्री.सी.ए.केलागडे यांनी सहभाग घेतला.