केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याच्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाचा बेळगावातील संशयीताने इन्कार केल्यामुळे नागपूर पोलिसांनी आता गडकरींना लावण्यात आलेल्या फोनवरून ज्या अन्य चौघाजणांशी संपर्क साधण्यात आला त्यांची जबानी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार हिंडलगा कारागृहाचे अधिकारी कैद्यांना कोणतीही दयामाया न दाखवता अतिशय कडक वागणूक देत असल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी पुजारीने केंद्रीय मंत्री गडकरी यांना धमकीचा फोन केला होता. नागपूरचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकावणारा फोन ज्या मोबाईल नंबर वरून करण्यात आला त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासले जात आहे. खंडणी वसुलीच्या गुन्ह्याखाली मंगलोरच्या जयेश पुजारी या कुख्यात गुंडाला ज्या बेळगावच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या जेलमधून संशयीताने गडकरी यांच्या कार्यालयाला फोन लावण्याबरोबरच अन्य चौघांशी देखील संपर्क साधला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी फोन करण्याच्या प्रकरणात श्रेयस तेजस पुजारी या गुंडाचा हात आहे हे सिद्ध करण्यासाठी नागपूर पोलीस आता संबंधित चार व्यक्तींची जबानी घेण्याच्या तयारीत आहेत.
पोलिसांनी गेल्या सोमवारी पुजारी याची चौकशी केली असता त्याने मंत्री गडकरी यांच्या फोन प्रकरणातील आपल्या सहभागाचा इन्कार केला आहे. दरम्यान ज्या मोबाईल फोनवरून खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती तो फोन हिंडलगा कारागृहाच्या अधिकाऱ्यांना अद्यापही सापडलेला नाही. कॉलरवर शेअर झालेल्या फोन नंबरवरून धमकीचा फोन पुजारी यानेच केल्याचा पोलिसांचा संशय आहे. नागपूर येथील गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गेल्या शनिवारी सकाळी 11:25 11:45 आणि दुपारी 12:32 वाजता खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. फोनवर पुजारीने टेलिफोन ऑपरेटरला आपण ‘डी गॅंग’ चा सदस्य असल्याचे सांगून आपल्याला मंत्री गडकरी यांच्याकडून 100 कोटींची खंडणी हवी असल्याचे सांगितले तसेच खंडणीची रक्कम कर्नाटकात कोठे पोहोचवायची याचा तपशीलही त्याने ऑपरेटरला दिला. खंडणी न दिल्यास बॉम्बने मंत्री गडकरी यांना ठार मारण्याची धमकी त्याने दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.