केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाऊद इब्राहिमच्या नावाने फोनवरून धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याची नागपूरच्या एटीएस पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे. काल सोमवारपर्यंत एटीएसचे पथक बेळगावतच ठाण मांडून होते. धमकी प्रकरणी कारागृहातील 7 अधिकाऱ्यांवर कारवाई करताना त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने संशयीत जयेशला नागपूर पोलिसांकडून अद्यापही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र कायदेशीररित्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चौकशीसाठी त्याला नागपुरात नेण्यात येणार आहे. बेळगावच्या हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या जयेशने दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करून केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात 100 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम कर्नाटकात पोहोचविण्याची सूचना करण्याबरोबरच खंडणी न दिल्यास जीवे मारण्याचे धमकीही देण्यात आली होती.
दरम्यान, एकीकडे पोलीस तपास सुरू असतानाच दुसरीकडे कारागृहातील 7 अधिकाऱ्यांना मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी कारणे दाखवा नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे.
कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक, चार जेलर व दोन वॉर्डन अशा एकूण सात अधिकाऱ्यांना मेमो देण्यात आला आहे. मंत्री गडकरी यांना धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल सापडलेला नाही. त्यामुळे सदर मोबाईल कोणाचा होता? कारागृहात तो मोबाईल कुठून आला ? याचा अद्यापही उलगडा झालेला दिसत नाही.