बेळगाव लाईव्ह विशेष : क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रत्येकजण टीव्हीवर पाहतो. मैदानावर जाऊन क्रिकेटचे सामने पाहतो. मात्र समालोचनाशिवाय क्रिकेट सामने पाहण्याची कल्पनाही करणे शक्य नाही. ठळक आवाज आणि क्रिकेटमधील ज्ञानामुळे अनेक समालोचक क्रिकेट सामन्यात रंग भरतात. समालोचनामुळे क्रिकेट सामन्याची चुरस वाढते. क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांची आतुरता आणि उत्कंठा वाढते. आजवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपण क्रिकेट समालोचन ऐकले आहे. मात्र मराठी भाषेत समालोचन ऐकण्याची संधी क्वचितच मिळते. बेळगावमध्ये आयोजिलेल्या आम. अनिल बेनके नॅशनल लेव्हल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगावकरांना मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक चंद्रकांत शेटे यांच्या माध्यमातूनअव्वल दजाचे मराठी भाषेतील समालोचन ऐकण्याची संधी मिळत आहे.
यू ट्यूब वर सामने live पहिल्या नंतर मैदानात धावते समालोचन ऐकण्यासाठी देखील गर्दी वाढत आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या झेन स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध रायगड सामन्यात आज चंद्रकांत शेटे यांनी आपल्या अनोख्या शैलीने सर्व खेळाडूंची ओळख सांगत समालोचनात रंग भरत सामने रंगतदार करण्यात मोठा हातभार लावला. त्यांच्या समालोचनाच्या शैलीने प्रेक्षकांतून वाहवा मिळवली.
चंद्रकांत भानुदास शेटे हे मूळचे घाटकोपर, मुंबई येथील रहिवासी आहेत. बरीच वर्षे क्रिकेट खेळाडू म्हणून खेळ खेळलेल्या चंद्रकांत शेट्ये यांनी लेदर बॉल, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतून अनेक सामने रंगविले आहेत. स्वतःच्या संघातून देखील स्वतःची अशी स्वतंत्र टीम त्यांनी निर्माण केली आहे. क्रिकेट स्पर्धेचे आयोजक म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली आहे. गेल्या ११ वर्षांपासून ते मराठी क्रिकेट समालोचक म्हणून काम करत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली त्याचबरोबर कर्नाटकात देखील मराठी मराठी भाषेत ते क्रिकेट सामन्यांचे समालोचन करत आहेत. कर्नाटकात बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथमच मराठी भाषेतील क्रिकेट समालोचन ऐकण्याची संधी चंद्रकांत शेटे यांच्या माध्यमातून बेळगावकरांना उपलब्ध झाली आहे.
केवळ भारतातच नव्हे तर दुबईमधील शारजा इंटरनॅशनल मैदानावर त्यांनी भारत-पाक क्रिकेट सामन्यांचेही समालोचन केले आहे. या क्रिकेट सामन्यात त्यांनी मराठी भाषेतून समालोचन केले हि विशेष बाब आहे. मागील वर्षी संपूर्ण वर्षभरात १३१ क्रिकेट स्पर्धांचे त्यांनी समालोचन केले आहे. बेळगाव मधील सरदार्स मैदानावर आमदार अनिल बेनके पुरस्कृत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे मराठी भाषेतून समालोचन देखील चंद्रकांत शेट्ये उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत.
मराठी भाषेतून झालेले क्रिकेट समालोचन ऐकून बेळगावकरांचा क्रिकेट सामन्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या नियोजना संदर्भात चंद्रकांत शेटे यांनी कौतुक केले असून बेळगावकर प्रेक्षक आणि क्रिकेट बाबत असलेली बेळगावकरांची उत्कटता यासोबतच आपल्या समालोचनाला बेळगावकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद याबद्दल त्यांनी बेळगावकरांचे आभार मानले आहेत. भारतात अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात मात्र बेळगाव मध्ये भरविण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेमधील क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांची गर्दी पाहून आपण थक्क झालो अशी प्रतिक्रिया चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केली.
बेळगाव मधील दररोज होणारी क्रिकेट सामन्यादरम्यानची गर्दी ही कित्येक ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या अंतिम सामन्यादरम्यान आपण पाहिली असल्याचे चंद्रकांत शेटे यांनी सांगितले. बेळगावकरांचे क्रिकेटशी अपूर्व असे नाते आहे. या ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट सामन्याबद्दल आपल्याला मोठे कुतूहल होते. यामुळे येथील क्रिकेट सामन्याचे समालोचन करण्याची मलाही उत्सुकता होती, असे ते म्हणाले. आज पहिल्याच दिवशी चंद्रकांत शेटे यांनी मराठीतून क्रिकेट समालोचन केले आणि बेळगावकरांनी पहिल्याच दिवशी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. देशभरात आयोजिण्यात येत असलेल्या क्रिकेट स्पर्धेचे समालोचन करताना आजवर अनेक आव्हानांना आपण तोंड दिले आहे, त्याचप्रमाणे बेळगाव मधील उत्कंठावर्धक क्रिकेट सामन्यांचे समालोचन करणे हे देखील आपल्यासाठी एक आव्हानच असून बेळगाव मधील क्रिकेट सामन्यांच्या अंतिम सामन्याचे समालोचन करणे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले
सरदार्स मैदानावर सुरू असलेल्या अनिल बेनके चषक क्रिकेटच्या महासंग्रामात देशातील विविध राज्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या क्रिकेट खेळाडूंनी सहभाग घेत स्पर्धेची उंची वाढवत स्पर्धा ऐहासिक बनवली. त्याचबरोबर बेळगावातील स्थानिक समालोचकांसह खास मुंबईतून आलेले चंद्रकांत शेटे यांच्या बहारदार समालोचनामुळे सरदार्स मैदानावर सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यांना उत्तुंग रंग चढत आहे.