Monday, December 23, 2024

/

सीमाभागात मराठी नाटके वाढण्यासाठी प्रयत्न करणार -मंत्री केसरकर

 belgaum

मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धनाच्या उद्देशाने बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्रातून येणारी मराठी नाटके प्रदर्शित होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे ते पूर्वीप्रमाणे वाढावे यासाठी तसेच येथील मराठी शाळा, ग्रंथालयं, संघ -संस्थांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री व सीमाभाग समन्वय मंत्री दीपकभाई केसरकर यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री दीपकभाई केसरकर आपल्या नातलगांच्या एका खाजगी कार्यक्रमासाठी आज सोमवारी सकाळी बेळगाव भेटीवर आले असता समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांच्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर हे तिसरे सीमाभाग समन्वय मंत्री आहेत.

बेळगावसह सीमा भागात महाराष्ट्रातून येणारी मराठी नाटके प्रदर्शित होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे, ते पूर्वीप्रमाणे वाढावे. त्याचप्रमाणे नाटकांवर जो अतिरिक्त कर लावला जातो तो देखील कमी करण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र खातं निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे बेळगावसह सीमा भागात प्रदर्शित होणाऱ्या मराठी नाटकांना करामध्ये सवलत दिली जावी. ही सवलत म्हणजे सीमा भागात मराठी नाटक प्रदर्शित करण्यासाठी जो कर आकारला जातो. त्या कराचा महाराष्ट्र शासनाकडून परतावा (रिफंड) केला जावा. या सर्व बाबींसंदर्भात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मी विनंती करणार आहे.

नाटकांच्या माध्यमातून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची विनंतीही केली जाईल. याखेरीज महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड शाळांच्या विकासासाठी ज्या योजना आखून निधीची तरतूद करत आहे. त्याप्रमाणे कर्नाटक सरकारने देखील महाराष्ट्र शासनाला सीमा भागातील मराठी शाळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यास परवानगी द्यावी, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी चर्चा केली असल्याचे असे मंत्री दीपकभाई केसरकर यांनी स्पष्ट केले.Deepak kesarkar

याव्यतिरिक्त सीमा भागातील मराठी ग्रंथालया, संघ -संस्था यांच्या उत्कर्षासाठी कशाप्रकारे अनुदान देता येईल, म्हाडाची घरे सीमावासियांना उपलब्ध करून देणे, महात्मा फुले योजने अंतर्गत सीमा वासियांना उपचार देणे,सीमा भागातील जनतेला मराठी परिपत्रक मिळवून देणे आदींसंदर्भात शिष्टमंडळाने मंत्री केसरकर यांच्याशी चर्चा केली.

याप्रसंगी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, समिती नेते सुनील अष्टेकर जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी,सचिव एम जी पाटील,वारकरी शंकर बाबली  महाराज आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.