बेळगाव लाईव्ह : पद, सत्ता, खुर्ची आणि नेतृत्व या गोष्टींचे व्यसन हे एखाद्या अंमली पदार्थापेक्षाही वाईट असते. सध्या हीच परिस्थिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाबाबत दिसून येत आहे. सीमालढा अंतिम पर्वात असताना या लढ्याचा सारथी असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रथाची चाके डगमगत असलेली पाहायला मिळत आहेत. खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये नुकताच एकीचा वज्रनिर्धार करण्यात आला. आणि यानंतर मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समिती नेतृत्वाकडे कार्यकर्त्यांनी आवासून पाहण्यास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयात अंतिम पर्वात असलेला सीमाप्रश्न, सकारात्मक पद्धतीने महाराष्ट्र सरकार मांडत असलेली बाजू आणि दुसऱ्या बाजूला एकसंघ नसलेल्या समिती नेतृत्वामुळे पुन्हा एकदा मराठी माणूस जागा झाला असून मध्यवर्ती, शहर, तालुका आणि इतर घटक समित्यांच्या पुनर्रचनेची मागणी जोर धरू लागली आहे.
एरव्ही तरुण कार्यकर्ते समिती नेतृत्वाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम नसल्याचे बोलले जायचे. मात्र आता खुद्द कार्यकर्त्यांकडूनच जबाबदारी सोपविण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व घटक समित्यांची पुनर्र्चना व्हावी, ‘एक व्यक्ती एक पद’ ही संकल्पना राबविली जावी, विभागवार विविध कमिट्या स्थापून पदांची जबाबदारी सोपविण्यात यावी, जबाबदारी सोपविण्यात आली तर कार्यकर्ते जोमाने काम करतील आणि या माध्यमातून व्यापक दृष्टिकोनातून विचारांची देवाण घेवाण होईल, व्यापक मते मांडली जातील. तसेच सीमाप्रश्नी मराठी माणूस भक्कमपणे आपली बाजू मांडू शकेल, अशा पद्धतीने संकल्पना अंमलात आणण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागल्याने सध्या कार्यकर्ते जोमात आणि समिती नेते कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आजवर मध्यवर्ती मध्ये कार्यरत असलेले नेते, पदाधिकारी यांच्याकडेच बहुतांशी शहर समितीची जबादारी सोपविण्यात आली आहे. किंबहुना इतर घटक समित्यांमध्ये देखील मध्यवर्तीमधील पदाधिकारीच काम पाहात आहेत. यामुळे ठराविक लोकांनाच पदे न देता पदांची संख्या वाढविण्यात यावी, मतदार संघावर त्या-त्या क्षेत्रात समिती स्थापन करून पदांची संख्या वाढविण्यात यावी, एकाच व्यक्तीला दोन समित्यांमध्ये पदांची जबाबदारी देणे गांभीर्याने टाळावे, अधिकाधिक कार्यकर्त्यांना पदांच्या माध्यमातून जबाबदारी सोपवून संघटित करावे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मुख्य प्रवाहात आणावे यासारख्या योजनांवर समितीने कार्य केल्यास समितीच्या पंखाला पुन्हा बळ येईल, यात तिळमात्र शंका नाही.
अलीकडेच खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकीचा निर्धार झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा खानापुरवर समितीचीच सत्ता आणण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकीची वज्रमूठ आवळली असून त्यादृष्टीने आतापासूनच युद्धपातळीवर काम देखील सुरु झाले आहे. याच धर्तीवर आता मध्यवर्तीच्या कार्यकारिणीसंदर्भातही निर्णय घ्यावा, आणि समिती नेतृत्वाचा तिढा सोडविण्यात यावा, अशी कळवळीची मागणी कार्यकर्ते आजवर करत आले आहेत. मात्र सोशल मीडिया वेगवान झाल्याने कार्यकर्त्यांकडून विनवणी नाही तर आता समितीच्या ज्येष्ठ नेत्यांना इशारा देण्यात येत आहे. यापुढे महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कोणाचीच अरेरावी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही मराठी भाषिकांकडून देण्यात आला आहे. मध्यवर्तीच्या कार्यकारिणीमध्ये खानापूरमधील २०, उत्तर मतदारसंघ, दक्षिण मतदारसंघ, ग्रामीण मतदार संघ आणि यमकनमर्डी मतदारसंघातील १५ सदस्यांना सहभागी करून समितीचे बळकटीकरण व्हावे, यादृष्टीकोनातून समिती बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार आता या कामासाठी कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये म्हणून समिती कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समिती नेत्यांना आव्हान दिले आहे.
या साऱ्या गोष्टींचा सारासार आणि गांभीर्याने विचार करून समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी नव्या नेतृत्वाला संधी देऊन लढ्याला बळ देण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. खुर्ची आणि पदाच्या मोहामुळे मराठी भाषिकांचे आजवर अतोनात नुकसान झाले आहे. मात्र भविष्यात पुन्हा मराठी भाषिकांच्या एकीचा वज्रनिर्धार करून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये परिवर्तनाची नांदी घडावी, अशी प्रामाणिक इच्छा प्रत्येक मराठी भाषिकाकडून व्यक्त केली जात आहे.