बेळगावमधील १३०० एकर सुपीक जमीन रिंग रोड साठी हडप करण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांसह स्थानिक जनतेचा प्रखर विरोध आहे. मात्र हा विरोध डावलुनही नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाने नोटीस पाठविली असून याविरोधात आज मंगळारी धारवाड येथील नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयात समिती नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली.
माजी आमदार आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती नेते मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने धारवाड कार्यालयात भेट देऊन प्रस्तावित रिंग रोड ला असलेल्या प्रखर विरोधाबाबत माहिती दिली. धारवाड कार्यालयाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या नोटिसीला उत्तर म्हणून बेळगावमधील प्रस्तावित रिंग रोड मध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त होणार असून याला प्रखर विरोध असल्याचे सांगितले.
धारवाड येथील नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मॅनेजरची भेट घेत रिंग रोडसाठी असलेला विरोध हा कायम असाच राहील, असे बजावून सांगण्यात आले. शिवाय रिंग रोडला पर्याय म्हणून फ्लाय ओवरचा पर्याय सुचविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा घेण्यास आमचा प्रखर विरोध असून पर्यायी फ्लाय ओव्हरसाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे. यामुळे या पर्यायाचा विचार नक्कीच करावा असे ठामपणे शिष्टमंडळाने सुचविले आहे.
शिष्टमंडळात माजी आमदार मनोहर किणेकर, समिती सचिव एम जी पाटील, सुनील अष्टेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा नेते आर एम चौगुले, आर आय पाटील, वकील सुधीर चव्हाण,शाम पाटील, चेतन पाटील,पुंडलिक पावशे आदी उपस्थित होते.