बेळगाव लाईव्ह : केपीटीसीएलच्या कनिष्ठ सहाय्यक परीक्षेसंदर्भात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे.
आतापर्यंत या प्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली असून अद्यापही या प्रकरणी पोलिसांनी धरपकड मोहीम सुरूच ठेवली आहे. डिसीबीआरचे पोलीस उपअधीक्षक विरेश दोडमनी आणि सहकाऱ्यांनी हि कारवाई केली असून सलग तीन दिवस अटकसत्र सुरु आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती संजीव पाटील यांनी दिली.
या कारवाईत अण्णाप्पा केम्पना मारवाडी (वय ३१, रा. मल्लापूर पी. जी. ता. गोकाक), जॉन रॉबर्ट यशवंत बंगेन्नावर (वय २६, रा. शिवापूर, गोकाक), चिदानंद चिन्नाप्पा माडलगी (वय २७, रा. राजापूर, ता. मुडलगी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनीही परीक्षेसाठी वापरलेले इलेक्ट्रिकल डिवाइस नष्ट केले असून पोलिसांनी महत्वाची कागदपत्रेही जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.