बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सरकारकडे केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ बाकी आहे. मात्र अल्पकाळासाठीही अनेक आमदार मंत्रिपदाची आस ठेवून आहेत.
मकर संक्रांतीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली असून बेळगाव जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळण्याची दाट शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि भाजपचे प्रभावी नेते आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या पथ्यावर मंत्रीपदे येण्याचीही शक्यता आहे. सवदी आणि जारकीहोळी यांच्यासह के. एस. ईश्वरप्पा, सी. पी. योगेश्वर यांच्यासह २० हुन अधिक आमदारांचा इच्छुकांच्या यादीत समावेश आहे.
मंत्रिपद देण्यात येत नसल्याने रमेश जारकीहोळी आणि ईश्वरप्पा यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही गैरहजेरी दर्शविली. त्यामुळे उभय आमदार नाराज असल्याचीही चर्चा रंगली होती.
सरकारचा कार्यकाळी कितीही शिल्लक असला तरी एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई आणि संसदीय मंडळाचे सदस्य येडियुराप्पा पक्षश्रेष्ठींना पटवून देणार आहेत. भाजपची सत्ता येण्यासाठी ज्येष्ठ आणि प्रभावी नेते लक्ष्मण सवदी यांनी मोठे योगदान दिले होते.
त्याकरिता त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांत राज्यात झालेल्या विविध पोटनिवडणुकांमध्ये सवदी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीतही त्यांनी काम केले. त्यांच्या सर्व कामगिरीचा विचार करता त्यांना मंत्रिपद देण्यात येईल, याची शक्यता अधिक आहे.
पाटबंधारे मंत्रीपदी कार्यरत असणारे रमेश जारकीहोळी हे अश्लील सीडी प्रकरणी अडचणीत आल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर क्लीनचितदेखील त्यांना मिळाली असून त्यांच्या मंत्रिपदासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली दरबारी वशिला लावला आहे. मात्र अद्याप त्यांच्या मंत्रिपदाबाबत निर्णय झाला नाही. ऑपरेशन कमळ अंतर्गत त्यांनी भाजपाची सत्ता आणण्यासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांनाही मंत्रिपद देण्याची शक्यता आहे.
सवदी, जारकीहोळी यांच्यासह के. एस. ईश्वरप्पा हेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक असून बेळगाव मधील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. के. एस. ईश्वरप्पा यांनाही चौकशीनंतर क्लिनचिट मिळाली असून त्यांच्याकडूनही मंत्रिपदासाठी प्रबळ इच्छा व्यक्त होत आहे. कार्यकाळ कमी असला तरीही पुढील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून व्होटबँक मिळविण्यासाठी भाजपाला जुन्या मंत्र्यांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे, यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.