बेळगाव शहरातील कांदा मार्केटमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करून रातोरात बसविण्यात आलेला दुकानाचा बेकायदेशीर खोका आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला. मात्र यावेळी काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार पेठ येथील कांदा मार्केटमध्ये काल रात्री कांही अज्ञातांनी रस्त्यावरच एक दुकानाचा खोका बसविला. रात्री अनधिकृतरित्या रस्त्यावर खोका बसवण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते संजय पाटील यांनी संबंधित अज्ञातांना हटकले.
त्यावेळी त्यांनी परवानगी घेऊन आपण हा दुकानाचा खोका बसवत असल्याचे सांगितले. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी जवळपास 100 हिंदुत्ववादी कार्यकर्ते कांदा मार्केट येथे जमा झाले आणि त्यांनी रस्त्यावर बेकायदेशीररित्या बसविण्यात आलेल्या दुकानाच्या खोक्याबद्दल संबंधित लोकांना जाब विचारण्यास सुरुवात केली.
तसेच दुकानाच्या खोक्यासंबंधीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. मात्र दुकानाचा खोका बसवणाऱ्यांकडून कागदपत्रे दाखवण्यास टाळाटाळ सुरू झाल्याने कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी तात्काळ त्या परिसराशी संबंधित महापालिकेच्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाडले.
कांदा मार्केटमध्ये दाखल झालेल्या मनपा अभियंत्यांनी चौकशीअंती परवानगीशिवाय या पद्धतीने रस्त्यावर दुकानाचा खोका बसवता येणार नाही अशी ताकीद दिली. तसेच पोलीस बंदोबस्तात तडकाफडकी तो दुकानाचा खोका रस्त्यावरून हटवून वाहनात घातला आणि महापालिकेच्या गोडाऊनकडे रवाना केला.
या सर्व घडामोडी दरम्यान कांदा मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि दुकानाचा खोका बसविणारे लोक यांच्यातील वादावादीमुळे परिसरात कांही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवली होती.