बेळगाव परिसरात साहित्य संमेलनाना सुरुवात झाली आहे. बेळगाव आणि शहर परिसरामध्ये दरवर्षी जवळपास 15 साहित्य संमेलन होत असतात.बेळगावमधील मराठी साहित्य संमेलनाचा पाया ज्या गावात रोवला गेला, ज्या गावातून साहित्य संमेलनाची परंपरा संपूर्ण सीमाभागात सुरु झाली त्या कडोली गावात रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी ३८वे साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे. या संमेलनाची मुहूर्तमेढ दुरदुंडेश्वर मठाच्या प्रांगणात सोमवारी रोवण्यात आली.
या कार्यक्रमात बोलताना शिवाजी कुट्रे म्हणाले, कडोली येथून सीमाभागात साहित्य संमेलनांची परंपरा सुरु झाली. यातून प्रेरणा घेत सीमाभागात अनेक गावात संमेलने भरविण्यात येत आहेत. सीमाभागात होणाऱ्या संमेलनांचा पाया रचण्याचे काम कडोली साहित्य संघाने केले. संमेलनातून संस्कार घडत असतात. यासाठी संमेलनांची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दुरदुंडेश्वर विरक्त मठाचे गुरुबसवलिंग स्वामी यांच्या उपस्थितीत मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम पार पडला. उमेश चौगुले दाम्पत्याच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक अशोक चांगुले म्हणाले, सलग तीस वर्षे कडोली येथे साहित्य संमेलन जोमाने भरविण्यात येत आहे. येथील साहित्य संघ साहित्य रसिकांसाठी जोमाने कार्यरत आहे. ग्रामीण भागात साहित्याची गोडी वाढवण्याचे काम कडोली साहित्य संमेलनाने केले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी साहित्य संघाचे बसवंत शहापूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पौरोहित्य श्रीधर नाडगौडा यांनी केले. यावेळी के. टी. उच्चुकर, विनोद भोसले, तानाजी कुट्रे, भरमा डोंगरे, कृष्णा मस्कार, उमाजो अतिवाडकर, दीपक होनगेकर, डॉ. प्रतिमा पाटील, सुरेख पवार, दीपा मरगाळे, प्रभावती पाटील, अशोक चौगुले, डॉ. विनोद पाटील, परशराम गौंडवाडकर, मोहन रुटकुटे, संभाजी होनगेकर, पांडू मायाण्णा, अनिल डंगरले, अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडाडकर यांनी आभार मानले.