पोलिसांकडून दररोज उपयोगात आणल्या जाणाऱ्या आयटी तपासामध्ये देशात कर्नाटक आणि राज्यात उत्तरपरिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या बेळगाव शहर आणि जिल्हा पोलिसांनी अतिउत्तम कामगिरी बजावल्यामुळे राज्यात बेळगावने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्टेट क्राईम रेकॉर्ड ऑफ ब्युरो तर्फे (एससीआरबी) दर महिन्याला राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिसांच्या आयटी तपास कामगिरीबद्दल पाहणी करून त्यांना गुण देऊन प्रोत्साहन दिले जाते. बेळगाव शहर, बेंगळूर शहर, आग्नेय विभाग, पश्चिम विभाग, केंद्र विभाग, बागलकोट, गुलबर्गा, बिदर, बेळगाव, कोप्पळ, कलबुर्गी शहर, मंगळूर शहर आणि धारवाड शहर यावेळी 100 पैकी 100 गुण मिळवून प्रथम क्रमांकावर आहेत.
तसेच गदग, बळ्ळारी, विजापूर आणि शिमोगा हे जिल्हे 99 टक्क्यांवर आहेत. बेळगाव उत्तर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या (आयजीपी) अखत्यारीत येणारे बेळगाव, बागलकोट, धारवाड, विजापूर आणि गदग जिल्ह्यातील पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. गेल्या चार-पाच महिन्यापासून बेळगाव शहर आणि बेळगाव जिल्हा पोलीस सातत्याने आयटी तपासात प्रथम क्रमांकावर आहेत हे विशेष होय.
बेळगाव आयजीपी कार्यालय व्याप्तीतील सर्व जिल्ह्यांनी आयटी तपासात जी उत्तम कामगिरी नोंदविले आहे. त्यामागे पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते पोलीस निरीक्षक व जिल्हा पोलीस प्रमुखांचे श्रम आहेत. त्यामुळे याचे सर्व श्रेय पोलीस कर्मचारी आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाते असे उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीश कुमार यांनी स्पष्ट करून त्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा पोलीस व्याप्तीत 35 पोलीस स्थानकात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगले श्रम व परिश्रम घेतल्याने 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.
आयजीपी एन. सतीश कुमार यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना केलेले योग्य मार्गदर्शन हे या यशाचे गमक आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सर्व पोलीस स्थानकात आयटीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभिनंदन पत्र धाडून शाबासकी दिली आहे. बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनीही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे