सरकारच्या विविध समाजपयोगी योजना जातीने लक्ष देऊन यशस्वीरित्या राबविण्याबरोबरच गाव स्वच्छतेसाठी मोठे प्रयत्न करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीसह 14 ग्रामपंचायतींना 2021 -22 सालचा ‘गांधीग्राम पुरस्कार’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
गांधीग्राम पुरस्कार हा 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त देण्यात येतो. मात्र यावर्षी थोड्या उशिराने हा पुरस्कार वितरण सोहळा होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या गावांनी अनेक योजना प्रभावीपणे राबविले आहेत. तसेच प्रत्येक योजनेमध्ये अधिक लक्ष देऊन त्या पूर्ण केल्या आहेत.
गाव स्वच्छतेसाठी मोठे प्रयत्न केले आहेत, अशा गावांना गांधीग्राम पुरस्काराने गौरविण्यात येते. मागील 2021 -22 सालचा हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असला तरी त्याचा वितरण सोहळा कधी होणार हे अजूनही राज्य सरकारने जाहीर केलेले नाही. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीला यावर्षी गांधीग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे.
हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मनोळकर यांच्या माध्यमातून गावात केलेले रस्ते गटारी अंगणवाडी सह इतर कामामुळे बेळगाव तालुक्यात या पंचायतीची निवड गांधी ग्राम पुरस्कारासाठी करण्यात आली आहे इथून पुढे देखील आपण विकास करतच राहणार असल्याचे नागेश मनोळकर बेळगाव live शी बोलताना सांगितले आहे.
केंद्र सरकारने प्रत्येक गावात स्वच्छता व इतर योजना राबविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. यासाठी तालुका पातळीवर जोरदार प्रयत्नही करण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून गांधीग्राम पुरस्कार देण्यात आले नव्हते. कांही पुरस्कार जाहीर करून ते थेट ग्रामपंचायतींना पाठवण्यात आले होते.
त्यामुळे यंदाच्या पुरस्काराविषयी अनेक ग्रामपंचायतींना उत्सुकता लागून राहिली होती. यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने हे पुरस्कार जाहीर केल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील नंदगाव (ता. अथणी), बेळवडी (ता. बैलोंगल), हिंडलगा (ता. बेळगाव), जागणुर (ता. चिक्कोडी), मेळवंकी (ता. गोकाक), हेब्बाळ (ता हुक्केरी), मोळे (ता. कागवाड), लोंढा (ता. खानापूर), कुलवळ्ळी (ता. कित्तूर), हळळूर (ता. मुडलगी), जत्राट (ता. निपाणी), औरादी (ता. रामदुर्ग), निलजी (ता. रायबाग) आणि बेटसूर (ता. सौंदत्ती) या 14 ग्रामपंचायतींना ‘गांधीग्राम पुरस्कार’ जाहीर झाला आहे.