राज्यातील दोघा जिल्हा न्यायाधीशांनी काल मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी न्यायाधीश रामचंद्र दत्तात्रय हुद्दार आणि व्यंकटेश नाईक थावरनाईक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ देवविली.
सदर शपथविधी सोहळ्यास कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्ना बी. वरले आणि मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई हे उभयता उपस्थित होते. त्यांनी दोन्ही अतिरिक्त न्यायाधीशांचे अभिनंदन केले.
न्यायाधीश रामचंद्र डी. हुद्दार यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी बेळगाव जिल्ह्यातील मुत्नाळ गावामध्ये झाला. बेळगावच्या आरएल लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर 1988 साली त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला.
त्यानंतर स्पर्धात्मक परीक्षेत उत्तम यश मिळवल्यामुळे त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झाली. पुढे 2012 मध्ये त्यांनी कुवेंपू विद्यापीठाची एलएलएम पदवी संपादन केली. आपल्या कारकीर्दीत न्यायाधीश हुद्दार यांनी उच्च न्यायालयाचे प्रशासकीय निबंधक, अतिरिक्त निबंधक (सर्वसामान्य) आणि पायाभूत सुविधा निबंधक म्हणून सेवा बजावली आहे.
त्याचप्रमाणे 2019 -20 मध्ये न्यायाधीश रामचंद्र हुद्दार यांची प्रामुख्याने आजी-माजी खासदार व आमदारांचे फौजदारी खटले हाताळणाऱ्या विशेष न्यायालयाचे (स्पेशल कोर्ट) न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
त्यानंतर 2021 -22 मध्ये त्यांची कर्नाटक ज्युडिशियल अकादमीचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आता गेल्या सप्टेंबर 2022 पासून न्यायाधीश रामचंद्र हुद्दार हे बेंगलोरमध्ये मुख्य शहर दिवाणी आणि सत्र न्यायाधीश म्हणून सेवा बजावत आहेत.