सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात बेंगलोर महापालिकेला देखील मागे टाकत बेळगाव महापालिकेने राज्यात आघाडी मिळवली असून गेल्या 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या काळात बेळगाव शहरातून तब्बल 4,698 टन सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात आला आहे.
कचरा वर्गीकरण, सुका कचरा विघटन, बायो मायनिंग यासंदर्भात बेंगळूर येथे नुकतीच गेल्या सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुक्या कचऱ्याबाबत झालेल्या चर्चेवेळी बेळगाव महापालिकेची आकडेवारी सरस ठरली आहे.
बेळगाव शहरातील सुका कचरा डालमिया व जे. के. सिमेंट या दोन कंपन्यांना पाठविला जातो. यापैकी जे. के. सिमेंट कंपनीला 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या काळात सर्वाधिक म्हणजे 4,227 टन कचरा बेळगावतून पाठविण्यात आला, तर 471 टन कचरा दालमिया कंपनीला पाठवण्यात आला आहे.
बेळगाव शहरात दररोज 300 टन कचरा जमा होतो. या कचऱ्याचे संकलन करून तो तुरमुरे येथे नेला जातो. तेथे कचरा वर्गीकरण केले जाते, म्हणजे सुका कचरा वेगळा केला जातो. ओल्या कचऱ्यावर तेथे प्रक्रिया केली जाते व त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक संकलन करून त्यापासून पीव्हीसी पाईपसाठी आवश्यक कच्चामाल तयार केला जातो.
तुरमुरी कचरा डेपोत जमा होणाऱ्या सुक्या कचऱ्याचा वापर सिमेंट उद्योगात इंधन म्हणून केला जातो. त्यात प्लास्टिक, तुटके चप्पल व अन्य साहित्याचा समावेश असतो. सुका कचरा नेण्यासाठी दोन सिमेंट कंपन्या व महापालिका यांच्या चार वर्षांपूर्वी करार झाला आहे.
त्यानंतर नियमितपणे या कचऱ्याची उचल कंपन्यांकडून केली जात आहे. या कचऱ्याच्या मोबदल्यात कंपनीकडून महापालिकेला कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळत नसले तरी त्या सुक्या कचऱ्याचे विघटन करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची बचत मात्र होत आहे.