बेळगाव लाईव्ह : हिंदुत्ववादी संघटनेचे नेते आणि श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
ज्या दिवशी रवी कोकितकर यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी एकच राउंड फायर झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र, ज्या वाहनातून रवी कोकितकर आणि त्यांचे सहकारी प्रवास करत होते, त्या वाहनात आणखी एक गोळी आढळून आली आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे.
रवी कुकीतकर यांच्यावर ज्या दिवशी हल्ला झाला त्यादिवशी त्यांचे सहकारी चालक मनोज देसुरकर यांच्या हाताला गोळी लागली. देसुरकर यांच्या हाताला लागलेली एक गोळी सापडली, तर दुसरी गोळी मंगळवारी दुपारी त्याच वाहनात आढळून आली आहे .
या प्रकारानंतर रवी कोकितकर यांनी पोलिसांच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला आहे. याचप्रमाणे पोलिसांच्या पारदर्शक तपासाबाबतही शंका व्यक्त केली आहे.
रवी कोकितकर यांच्यावर ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आपल्यावर दोन राउंड गोळीबार झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी एकच राउंड गोळीबार झाल्याची तक्रार नोंद केली.
मंगळवारी दुपारी त्यांच्या वाहनात दुसरी गोळी आढळून आल्यानंतर पोलीस तपासावर संशय व्यक्त करत कोकितकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकाला भेट दिली.