बेळगाव लाईव्ह : शिवसेनेच्या बेळगाव शाखेत गेल्या अनेक वर्षांपासून पदावरून मोठे घमासान सुरु आहे. बेळगावच्या शिवसेना जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी पदाची खुर्ची सुटत नसल्याने यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. शिवसेनेच्या बेळगाव शाखेतही दोन गट निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही गट स्वतंत्र कार्यक्रम राबवत आहेत. गटातटाचे राजकारण हे मातोश्री पर्यंतही पोहोचले. हा वाद आपसात मिटवून सीमाभागात शिवसेनेला बळकटी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सूचना करण्यात आल्या. मात्र पद आणि खुर्ची या दोन्ही गोष्टी सोडायला तयार नसलेले दोन्ही जिल्हा प्रमुख यांच्या आडमुठेपणामुळे अखेर बेळगाव शिवसेनाही तडा जाण्याच्या मार्गावर आहे.
शिवसेना नेत्यांच्या आडमुठेपणाला कंटाळून शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे , उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावच्या शिवसेनेत पडलेली फूट पाहता ‘बेळगाव लाईव्ह’ने यापूर्वीच हि भविष्यवाणी केली होती. शिवसेना नेत्यांनी
बेळगाव शिवसेना हि पदाच्या विळख्यात अडकल्याने काही दिवसांपूर्वी शिवसेना कार्यकारिणी बरखास्त होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत होती. अनेक दिवसांपासून शिवसेना कार्यकारिणीत बदल करण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत होती.
बेळगावमध्ये शिवसेना शाखेची स्थापना झाल्यापासून एकच व्यक्ती जिल्हाध्यक्ष पद उपभोगत असल्याने इतर शिवसैनिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. शिवसेनेच्या बेळगाव शाखेची जबाबदारी युवा पिढीकडे सोपविण्याची मागणीही करण्यात येत होती. मात्र याकडे विद्यमान जिल्हाध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याने शिवसेनेची बेळगावमध्ये दैना झाली आहे.
मध्यंतरीच्या काळात झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना नेत्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र शिवसेना नेत्यांमध्ये असलेल्या वादामुळे उघडपणे कोणीही मते मांडण्यास पुढाकार दाखवला नाही. शिवाय शिवसेनेत पक्षसंघटन वाढत नसल्याने वरिष्ठांकडे गेलेल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीमुळे बेळगाव शिवसेनेच्या कार्यकारिणीबाबत नवनव्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या. विधानसभा निवडणूक जवळ येत चालल्या असून आता या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये आलेला भूकंप हा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुनरावृत्ती घडवून आणेल अशी चिन्हे दिसत आहेत.
बेळगावमध्ये केवळ नावापुरत्या असलेल्या शिवसेनेत कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या धक्क्यामुळे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. बेळगावमधील शिवसेना हि आपापसात वाद आणि पदासाठी रस्सीखेच करण्यापुरती मर्यादित राहिली असल्याची टीका गेल्या कित्येक दिवसांपासून छुप्या पद्धतीने करण्यात येत होती. मात्र पदाधिकाऱ्यांनी आज दिलेल्या धक्क्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत पोखरण जगजाहीर झाली आहे. या साऱ्या प्रकारानंतर तरी शिवसेनेच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांनी पदाची लालसा सोडली तर पुन्हा शिवसेनेला चांगले दिवस येतील, अशी चर्चा शिवसैनिकातून होत आहे.