बेळगाव लाईव्ह : महानगर पालिका निवडणुकीनंतर महापौर-उपमहापौर निवडणुकीची आवासून वाट पाहणाऱ्या नगरसेवकांना तब्बल १७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आनंदाची बातमी मिळाली आहे.
मात्र, बेळगाव महानगरपालिकेतील वादग्रस्त प्रभागामधील एका नगरसेवकाने या आनंदाच्या भरात शपथविधी होण्यापूर्वीच कंत्राटदाराकडून कमिशन खाल्ल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
बेळगावमध्ये अलीकडेच एका प्रभागात विकासकामे न झाल्याने फलकावर जाहीर निषेध नोंदवून आपल्या प्रभागात विकासकाम झाल्याचे आढळल्यास आणि विकासकाम झाल्याचे दाखवून दिल्यास बक्षीस घेऊन जाण्यासंदर्भात उपहासात्मक माहिती फलकावर लिहिण्यात आली होती.
मात्र, याच प्रभागातील अपक्ष उमेदवाराने शहराच्या मध्यवर्ती भागात रस्ते आणि गटारीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून कमिशन घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भागात कंत्राटदाराला येऊ न देता परस्पर कमिशन घेऊन प्रभागाच्या विकासाला खीळ बसवण्यात आला
असल्याचा आरोपही नागरिकांतून होत असून नगरसेवकाने केलेल्या या प्रतापामुळे नागरिकांमध्ये पुन्हा संताप उफाळून आला आहे. शिवाय या कमिशन प्रतापाची चर्चाही जोरदार सुरु आहे.