बेळगाव लाईव्ह : आहार, खाद्यपदार्थांचा दर्जा आणि गुणवत्ता अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार (FSSAI) ठरविण्यात आली असून यासाठी नियमावलीही ठरविण्यात आली आहे.
परंतु बेळगावमधील काही हॉटेल व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यविक्रेते नियमावलीचे पालन न करता आहार सुरक्षा व गुणवत्ता जपत नसल्याचे निदर्शनात आले असून यासंदर्भात आहार सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल चालक, मालक आणि रस्त्याशेजारील खाद्य विक्रेत्यांना धारेवर धरत आहार-पदार्थांच्या गुणवत्तेची वारंवार चाचणी करून घ्यावी, तसेच याबाबत त्रुटी आढळल्यास कारवाईसह दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
खाद्यपदार्थांचा दर्जा आणि गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळल्याने बेळगावमधील हॉटेल्सना यंदा १ लाख १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून काही हॉटेल्समध्ये स्वयंपाकात अजिनोमोटो सारख्या प्रतिबंधित पदार्थांचा उपयोग करण्यात आल्याचे आढळून आले आहे. अशा हॉटेल आणि दुकानांना टाळे ठोकण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
धावपळीच्या युगात अलीकडे मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ पुरविण्याच्या हॉटेल्स, खानावळी आणि रस्त्याशेजारील खाद्यविक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली असून या व्यवसायासाठी FSSAI चे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
मात्र वेळोवेळी आहाराची गुणवत्ता तपासणे आणि यासोबतच पोषक आणि सकस आहार देणेही तितकेच महत्वाचे आहे. मात्र काही खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यावसायिक नियमावलीचे उल्लंघन करत असल्याचे आढळून येत असून याबाबत आहार सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही जागरूक राहून वेळोवेळी आहार-पदार्थांच्या गुणवत्तेची वारंवार चाचणी करण्यासाठी खाद्यविक्रेत्यांना सूचना करणे आवश्यक आहे.