बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या तापमानात गेल्या २ दिवसांपासून घट झाली असून अचानक थंडीला सुरुवात झाली आहे. नेहमीच थंड हवामान असणाऱ्या बेळगावला परगावाहून येणाऱ्या नागरिकांची पसंती असते. मात्र विचित्र हवामानामुळे यंदा बेळगावकर हैराण झाले आहेत.
डिसेंबर महिन्यातदेखील पाऊस पडल्याने हवामानाचे वेळापत्रक बदलल्याचे जाणवत आहे. साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचे प्रमाण वाढते. मात्र यंदा जानेवारी महिना सुरु झाला तरी थंडीचा पत्ता नव्हता.
मागील आठवड्यात अधिक उष्मा जाणवत होता. यामुळे यंदा थंडी गायब झाल्याचे जाणवत होते. मात्र गेल्या २ दिवसात पुन्हा थंड वातावरणाला सुरुवात झाली असून बेळगावकरांना थंडीने हुडहुडी भरली आहे.
सातत्याने बदलत्या ऋतुमानामुळे नागरिकांना तब्येतीच्या तक्रारी जाणवत असून गेल्या वर्षभरात सातत्याने अशा बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. सकाळी ढगाळ, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी अचानक पाऊस अशा वातावरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
डिसेंबर महिन्यात देखील पावसाळ्या मोठ्या सारी कोसळल्या असून ऐन सुजित आलेल्या पावसामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले. यंदाचा सुगीचा हंगामदेखील उशिरा सुरु झाल्याने रब्बी हंगामालाही उशिरा सुरुवात झाली आहे.
गेल्या चार दिवसात यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी बेळगावचा पारा १२ अंशावर घसरला होता. यामुळे बेळगावकर गारठले आहे. सायंकाळी ५-६ च्या दरम्यान थंडीमध्ये अधिक वाढ होत असून पहाटेच्यावेळीही थंडीने सर्वांना हुडहुडी भरवली आहे. उत्तर भारतात थंडीची जोरदार लाट आली आहे आणि त्याचाच परिणाम बेळगावच्या हवामानावर दिसून येत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
बेळगावमध्ये अनेक ठिकाणी उबदार कपडे विक्रेते आहेत. गेल्या २ दिवसात वाढलेल्या थंडीमुळे ग्राहकांची रीघ उबदार कपडे खरेदी करण्याकडे वाढली आहे. पहाटे थंडीचे प्रमाण अधिक असल्याने मॉर्निग वॉकर्सच्या संख्येत देखील कमालीची घट झाली आहे.