बेळगाव महानगरपालिकेमध्ये आणखी 100 सफाई कामगारांची भरती केली जाणार असून त्याबाबतची अधिसूचना महापालिकेने जारी केली आहे.
सदर भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी आहे तथापि महापालिकेकडून ऑनलाइन वेतन घेणाऱ्या व कंत्राटी पद्धतीने शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे महापालिका आयुक्तांकडून ही भरती होणार आहे .
ऑनलाइन वेतन घेणाऱ्या सफाई कामगारांची संख्या 538 आहे त्यापैकी 100 जणांना सेवेत कायम करून घेतले जाणार असल्याने कामगारांमध्ये तीव्र स्पर्धा होणार आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार बेळगाव महापालिकेसाठी सफाई कामगारांची 393 पदे मंजूर झाली आहेत.
महापालिकेकडे सध्या केवळ 127 नियमित सफाई कामगार असून 153 कामगारांची भरती केली जात आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सफाई कामगारांची संख्या जास्त असल्याने आणखी 100 कामगारांची भरती करण्यास नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत रोस्टरची अंमलबजावणी होणार असल्याने सर्व प्रवर्गातील सफाई कामगारांना संधी मिळणार आहे.
तथापि ऑनलाईन वेतन घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे ठेकेदारांकडे सेवा बजावणाऱ्या सुमारे 700 सफाई कामगारांवर अन्याय होणार आहे.