भारतीय निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देण्यात येणारा राज्य पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट निवडणूक अधिकारी’ हा पुरस्कार बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना जाहीर झाला आहे.
भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा पुरस्कार जाहीर केला. बेंगलोर येथील टाऊन हॉलमध्ये उद्या बुधवारी 25 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे. या समारंभात राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
याप्रसंगी कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना आणि बीबीएमपी आयुक्त तुषार गिरीनाथ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मतदार नोंदणी, तपासणी वगैरे निवडणुकीशी संबंधित सर्व कामे उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
बेळगावचे जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांच्यासह तुमकुर, यादगिरी आणि उडपी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त सर्वोत्तम सहाय्यक निवडणूक अधिकारी, मतदान बूथ अधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवडणूक तांत्रिक विभागाचे कर्मचारी यांना देखील बेंगलोर येथील समारंभात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.