हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या टकरीत शहीद झालेले बेळगावचे सुपुत्र विंग कमांडर हनुमंतराव सारथी पंचत्वात विलीन झाले. अमर रहे, अमर रहे हनुमंतराव सारथी अमर रहे अशा जयघोषात, बेळगावातील गणेशपूरमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मध्यप्रदेशमधील मुरेना जिल्ह्यात सुखोई आणि मिराज विमानांच्या सरावावेळी झालेल्या धडकेत बेळगावचे सुपुत्र विंग कमांडर हनुमंतराव रेवणसिद्दप्पा सारथी यांना वीरमरण आले होते. त्यानंतर रविवारी दुपारी 12.30 वाजता लष्कराच्या विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मृतदेह सांबरा विमानतळावर आणण्यात आले. यावेळी आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
सांबरा विमानतळावरून सजवलेल्या लष्करी वाहनातून विंग कमांडर सारथी यांचा पार्थिव देह त्यांच्या गणेशपूर, बेळगाव येथील निवासस्थानी रवाना करण्यात आला. अंत्यदर्शन घेण्यासाठी निवासस्थानी पार्थिव काही काळ ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या “सारथी” या निवासस्थान परिसरात रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सेवारत आणि निवृत्त जवानांची मोठी उपस्थिती यावेळी होती. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मृतदेह घरात नेला. विंग कमांडर हनुमंतराव यांच्या पत्नीला हवाई दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वज, टोपी दिली.
यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगल अंगडी, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष व माजी आ. संजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हनुमंतराव सारथी यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी हनुमंतराव यांची आई सावित्री, पत्नी मीमांसा, बहीण आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडून एकच आक्रोश केला. तो काळीज पिळवटून टाकणारा होता.
बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावातील गणेशपूर स्मशानात हवाई दलातर्फे विंग कमांडर हनुमंतराव सारथी यांना हवेत तीन फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली. मोठे बंधू प्रवीण यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. धनगर समाजाच्या धार्मिक विधीनुसार शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सारथी कुटूंबियांचे नातेवाईक, हवाई दल, भूदलाचे अधिकारी व जवान तसेच गणेशपूर, बेनकनहळ्ळी ग्रापं अध्यक्ष, सदस्य यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.