बेळगाव : अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत असलेल्या मागणीला अनुसरून आजपासून रेल्वे क्रमांक ०७३३५ या बेळगाव-सिकंदराबाद-बेळगाव एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला.
मंगळवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला असून पहिल्याच दिवशी रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. या रेल्वेमुळे बेळगावहून हैद्राबाद परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
मागील २ वर्षांपासून बेळगाव-हैद्राबाद दरम्यान बंद असलेली एक्स्प्रेस रेल्वे सुविधा पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पुढील काळात बेळगाव-सिकंदराबाद-बेळगाव एक्स्प्रेस रेल्वेसेवा कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
बेळगाव-सिकंदराबाद-बेळगाव एक्स्प्रेच्या शुभारंभप्रसंगी आम. अनिल बेनाके, शरद पाटील, दिग्विजय सिदनाळ, विक्रम राजपुरोहित, जयतीर्थ सवदत्ती, संदीप जिरगे, मुरुगेंद्रगौडा पाटील, सौ.भाग्यज्योती बिदरगट्टी, युवा मोर्चाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर रेल्वे दररोज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी बेळगावमधून निघणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.50 वाजता सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी निघालेली एक्प्रेस दुसऱ्या दिवशी दुपारी 3.55 वाजता बेळगाव रेल्वेस्थानकात पोहोचणार आहे. हैदराबादपासून सिकंदराबाद हे जंक्शन अवघ्या काही मिनिटांवर आहे. त्यामुळे सिकंदराबाद येथे पोहोचून तेथे हैदराबाद गाठता येते.