बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करून विविध प्रलोभने देण्यात मागील निवडणुकीपासून ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींचा मोठा हातखंडा आहे. भेटवस्तू देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा यंदाच्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेला फंडा खुद्द आमदारांनाच महागात पडला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संपर्क साधून छाप पाडण्यासाठी पूर्व भागात गेलेल्या अक्कांना आज त्यांच्याच कल्पनेमुळे मोठा फटका सहन करावा लागला आहे. आपल्या समर्थकांसह मतदारांच्या भेटीसाठी गेलेल्या दौऱ्यादरम्यान अक्कांचे नारळ फोडूनच स्वागत करण्यात आले.
गेल्या आठवड्याभरापासून मतदारांना भेटवस्तू देऊन वापरण्यात येणाऱ्या नारळ फंड्याविरोधात आज होन्याळ गावात विद्यमान ग्रामीण आमदारांना जनतेचा रोष सहन करावा लागला. विशिष्ट भागात आमदारांचा दौरा आल्यानंतर संतप्त मतदारांनी नारळ फोडून त्यांचे स्वागत केले.
शिवाय ध्वनिक्षेपकावरून क्षुल्लक भेटवस्तुंसाठी आपण आपला स्वाभिमान विकणार नसल्याचे जाहीरपणे घोषित करण्यात आले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विद्यमान आमदारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
रविवारपासून ग्रामीण भागात नारळावर हात ठेऊन शपथ घेण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. नारळावर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर भेटवस्तू देण्यात येत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांवर तसेच सोशल मीडियावर सर्व व्हिडीओ वायरल होत असून नंदिहळ्ळी या गावातील जागृत देवस्थान वाकडेवड येथून सदर नारळ मंतरून आणल्याचा खुलासाही झाला आहे. या खुलाशामुळे ग्रामीण भागातील महिलांची घाबरगुंडी उडाली असून मिक्सर वाटपाला नागरिकांचा रोष समोर येत आहे.
नारळ प्रकारावरून ग्रामीण भागात गोंधळ उडाला असून याबाबत एक ध्वनिफीतही मतदारांनी जारी केली असून जोवर ग्रामीण मतदार संघाच्या महिलांच्या मनगटात ताकद आहे तोवर अशा मिक्सरची आपल्याला गरज नसल्याचे यात म्हटले आहे. आपण स्वाभिमानाने राहणारे लोक आहोत, घरातील खंदे पुरुष जोवर समर्थ आहेत तोवर आपल्याला इतरांनी दिलेल्या वीतभर साड्यांची गरज नाही, जोवर आमच्या घरातील चूल अहोरात्र पेटते तोवर आम्हाला प्रेशर कुकरची गरज नाही. आम्ही गरीब जरूर आहोत, लाचार आहोत, अशिक्षित आहोत परंतु आम्ही लाचार नाही, त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी पडून आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही, असे या ध्वनिफितीत ठणकावून सांगण्यात आले आहे. शिवाय ज्यांनी नारळाचा प्रताप केला आहे त्यांच्याच डोक्यात नारळ फोडा अशा प्रकारची ध्वनिफीत जारी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात सर्वाधिक विकास झाल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केला आहे. मात्र ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहिल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे. ग्रामीण मतदार संघात झालेल्या विकासावर विद्यमान आमदारांना विश्वास नसेल तर नारळ वापरून, भेटवस्तूंची वाटप कशाकरिता करण्यात येत आहे? विद्यमान आमदारांना आपण केलेल्या विकासाची खात्री नसेल किंवा मतदारांवर विश्वास नसेल किंवा आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असेल, यामुळे अशा नवनवीन कल्पना लढवून मतदारांना भुलवण्याचे काम करण्यात येत आहे, अशा प्रतिक्रिया ग्रामीण मतदार संघात उमटत आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान आमदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, हे निश्चित!