बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार वेगवान तपास घेत ग्रामीण पोलिसांनी ८५०००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, एक चारचाकी वाहन, २ दुचाकी आदी साहित्य जप्त केले आहे.
२ नोव्हेंबर २०२२ रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या मच्छे येथील लक्ष्मी नगर मध्ये घरफोडी आणि चारचाकी वाहन चोरीप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली होती.
या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस विभागाचे एसीपी एस. व्ही. गिरीश, पीआय श्रीनिवास हांड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मच्छे औद्योगिक विभाग परिसरात संशयास्पद रित्या आढळून आलेल्या कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर (वय २३, रा. बडाल अंकलगी, सध्या रा. नावगे) आणि नागराज उर्फ अप्पू संगप्पा बुदली (वय ३०, रा. रंगदोळी, बेळगाव) या दोन आरोपींना अटक केली आहे.
या आरोपींनी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील ३ घरे, एपीएमसी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत १ घर आणि उद्यमबाग परिसरातील १ घर लक्ष्य करून चोरी केली आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १ चारचाकी वाहन, २ दुचाकी, सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि दूरदर्शन संच असे एकूण ८५०००० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. या कारवाईत पीआय श्रीनिवास हांड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.