मकर संक्रांत अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपली आहे त्यामुळे तिळगुळ, तिळाचे लाडू व अन्य साहित्यांसह हरभरा, बेळगावच्या सुप्रसिद्ध लहान हिरव्या वाटाण्याच्या शेंगा देखील बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे निर्बंधात साजरी झालेली मकर संक्रांत यंदा उत्साहात साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. नवीन वर्षातील हा पहिला सण मोठ्या उत्साहात साजरा होणार हे लक्षात घेऊन बाजारपेठ सज्ज झाली आहे. जानेवारी महिना आला की शहरवासीयांना मकर संक्रांतीची उत्कंठा लागून राहिलेली असते. या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात प्रेमळ, आनंदी वातावरण असते.
शहराच्या तुलनेत या सणाच्या कालावधीत ग्रामीण भागात अधिक आनंदी व उत्साही वातावरण असते. कारण शेतकऱ्यांसाठी हा कालावधी वर्षभर शेतात केलेल्या श्रमाचे फळ देणारा असतो. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कापणी केलेले धान्य शेतकऱ्यांच्या घरी येते. शहरवासीयांसाठी आता हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. आता दिवस लहान आणि रात्र मोठी असणार आहे.
थंडी पडण्याबरोबरच बेळगावच्या चविष्ट हिरव्या वाटाण्याच्या शेंगा बाजारपेठेत दाखला झाल्या आहेत. तसेच ताजा हिरवागार हरभरा देखील अबाल वृद्धांना आकर्षित करू लागला आहे.
रामदेव गल्लीत स्वेटरसह उपदार कपड्यांचा जादा स्टॉक घेऊन विक्रीसाठी बसलेले तिबेटियन्स हिवाळ्याचा मोसम पूर्ण भरात असल्याची जाणीव आपल्याला करून देत आहेत. एकंदर थंडी असली तरी मकर संक्रांत उत्साहात साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.