बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बाकमूर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या परिसरातून जा-ये करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यावरून मार्गस्थ होणे, धोक्याचे कारण बनले असून गावची बस सेवाही कोलमडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले.
गेल्या कित्येक दिवसापासून बाकनूर रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे या गावची बस सेवा पूर्णपणे कोलमडलेली आहे. गावात वेळेवर बस येत नाही. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना ये -जा करताना समस्या उद्भवत आहेत.
रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे वारंवार छोटेमोठे अपघात घडत आहेत. हि समस्या लक्षात घेऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या शाळेच्या मुलांच्या परीक्षा जवळ आल्या असून शाळेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरही खूप मोठा परिणाम होत असून शाळेचे क्लास वर्गही चुकत आहेत त्यामुळे सदर बस सेवा सुरळीत सुरू ठेवा आणि रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली यावेळी गावातील सर्व विद्यार्थी पालक वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन सादर करताना तालुका म. ए. समितीचे नेते, माजी आम. मनोहर किणेकर, युवा नेते आर. एम चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण, एम. जी. पाटील तसेच बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हात्रु मजुकर, नारायण गोडसे, विठ्ठल मजकूर, विठ्ठल गोडसे, नाना मजकूर, रवळु गोडसे, शंकर गोडशे, राघोबा मजुकर आणि विद्यार्थी वर्ग तसेच गामस्थ उपस्थित होते.