Tuesday, November 19, 2024

/

जात, धर्मा पलीकडे जाऊन माणुसकीचे पूल बांधा : खास. डॉ. अमोल कोल्हे

 belgaum

बेळगाव लाईव्ह : धर्माची सांगड घालून होत असलेल्या राजकारणामुळे देशातील वातावरण बिघडत चालले असून याबाबत महाराष्ट्रातील शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी परखड विचार व्यक्त केले. कोडोली येथे बहुजन समाज यमकनमर्डी मतदारसंघातर्फे स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास कसबा येथील रामनाथगिरी समाधी मठाचे राष्ट्रीय धर्माचार्य प. पु. भगवानगिरी महाराज तसेच कडोली दुरदुन्डेश्वर विरक्त मठाचे प. पु. श्री गुरु बसवलिंग महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात आपले विचार मांडताना डॉ. अमोल कोल्हे यांनी जात-धर्म-भाषा वादावर परखड मते व्यक्ती केली. आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्याचा अभिमान बाळगणे यात वावगं काही नाही. परंतु जात आणि धर्म या दोन गोष्टी दगडांप्रमाणे असतात या दगडांनी भिंती बांधल्या तर माणूस माणसापासून वेगळा होईल. यामुळे जाती धर्माच्या भिंती बांधण्या ऐवजी त्याचा पूल बनवला तर संपूर्ण समीकरणच बदलून जाईल, असे सांगत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सौहार्दतेचे वातावरण जपण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्र बलशाली बनवायचे असेल तर राज्यांनी एकसंघ राहणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी बेळगावकरांची शिवरायांवर, शंभुराजांवर असलेली निस्सीम श्रद्धा आणि बेळगावकरांनी कायम आपल्यावर केलेले आणि आदरातिथ्य याबाबत डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. स्वराज्य संकल्प मेळाव्याला महिलांची उपस्थिती पाहून समाजाचे भवितव्य उज्वल असल्याचे सांगितले. आज कालच्या डिजिटल युगामध्ये मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढला असून टीव्ही, टॅबलेट, मोबाईल, समोर बसणारी मुले आज पोकेमॉन, डोरेमॉन यासारख्या कार्टून नेटवर्क कॅरेक्टर्स यांचे आदर्श जपतात मात्र अशा आदर्शांच्या गर्दीमधून आपला इतिहास आणि संस्कृती जागवण्यासाठी प्रयत्न होत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.Amol kolhe

स्वराज्य संकल्प मेळाव्याबाबत बोलताना त्यांनी ही कल्पनाच अनोखी असल्याचे सांगत छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याबाबत उपस्थितांना उद्देशून आपली मते मांडली. साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यांचं नाव घेतलं की प्रत्येकाची मान अभिमानाने ताठ होते, मात्र ‘स्वराज्य संकल्प’ हा केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणेने करायचा नाही तर ती घोषणा देण्यासाठी नैतिक अधिष्ठान आणि नीतिमत्ता आपल्यामध्ये आली पाहिजे, सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी आपल्यावर आली पाहिजे हि भावना जोपासणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. देव आहे की नाही याबद्दल आपण सांगू शकत नाही. मात्र, माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचलेला राजा आपण पाहिल्याचे ते म्हणाले.

जाती-धर्मात होत असलेल्या वादावरून बोलताना ते म्हणाले, स्वधर्माचा अभिमान म्हणजे परधर्माचा द्वेष नाही आणि याच पद्धतीने स्वभाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे परभाषेचा द्वेष नव्हे, याचाहि विचार प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. स्वराज्य स्वराज्य संकल्प मेळाव्यामध्ये राजकीय साक्षरता असणे गरजेचे असून हल्लीची राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला कधी इतिहासात रंगवलं जातं, तर कधी भूगोलात घुसवलं जातं आणि परिणामी वर्तमानातून लक्ष विचलित होतं अशा विचारातून त्यांनी सद्यस्थिती कथन केली. जाती-धर्माच्या वादावरून एकमेकांशी भांडताना महागाई, बेरोजगारीचे चटके कमी होणार नाहीत त्यामुळे नाहक गोष्टींमुळे आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी सर्वाना केले. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.