अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 भव्य बक्षीस रकमेच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये एवायएम बी अनगोळ आणि एमपी बॉईज धोबीघाट या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून स्पर्धेची पुढची फेरी गाठली आहे.
सरदार्स हायस्कूल मैदानावर आज गुरुवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथमेश मोरे इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी फॅन्को क्रिकेट क्लब संघावर 44 धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना मोरे इलेव्हन संघाने मर्यादित 12 षटकात 4 गडी बाद 139 धावा काढल्या. त्यांच्या इजाज कुरेशी याने शानदार 52 धावा काढत अर्धशतक झळकविले. त्याला नितीन मातुंगे (नाबाद 34 धावा), कृष्णा सातपुते (24 धावा) व चुन्नी गोयल (20 धावा) यांनी चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरा दाखल फॅन्को क्रिकेट क्लबला मर्यादित 10 षटकात 8 गडी बाद 95 धावा काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी मोरे इलेव्हन संघाचा इजाज कुरेशी हा ठरला. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रातील मातब्बर खेळाडू असलेल्या एवायएम बी अनगोळ संघाने प्रतिस्पर्धी एसजी स्पोर्ट्स संघावर 32 चेंडू आणि 9 गडी राखून एकतर्फी विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना एसजी स्पोर्ट्स संघाने मर्यादित 10 षटकात 3 बाद 84 धावा काढल्या. हे आव्हान लीलया पेलताना एवायएम संघाने अवघ्या 4.4 षटकात 1 गडी गमावून 88 धावा झळकवत सामना जिंकला. त्यांच्या सुमित धोंगडे (नाबाद 34 धावा), अमित नाईक (नाबाद 27 धावा) आणि प्रथमेश मठ (24 धावा) यांनी तडाखेबंद फलंदाजीचे प्रदर्शन केले. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी एवायएम संघाचा सुमित धोंगडे हा ठरला.
तिसऱ्या सामन्यात एमपी बॉईज धोबीघाट संघाने प्रतिस्पर्धी सिटी कार्पोरेशन बेळगाव (सीसीबी) संघाला 4 गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना सीसीबी संघाने मर्यादित 10 षटकात 7 बाद 77 धावा काढल्या. प्रत्युत्तरा दाखल एमपी बॉईज संघाने 9 षटकात 6 गडी बाद 81 धावा काढून सामना खिशात टाकला. त्यांच्या प्रवीण शेरी (नाबाद 26 धावा), विशाल गोरगोंड (16 धावा), दिनेश पुजारी (13 धावा) व अलोक बडगावी (10 धावा) यांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी एमपी बॉईज संघाचा स्वयंम अप्पन्नावर हा ठरला. त्याने भेदक गोलंदाजी करताना 14 धावात 4 गडी बाद केले. सायंकाळी झालेला आजचा शेवटचा चौथा सामना सकाळी झालेल्या पहिल्या दोन सामन्यांमधील विजेत्या संघांमध्ये खेळविण्यात आला.
या सामन्यात स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना बलाढ्य एवायएम बी अनगोळ संघाने प्रतिस्पर्धी प्रथमेश मोरे इलेव्हन संघावर 20 धावांनी मात करून पुढची फेरी गाठली.प्रथमेश मोरे संघात महाराष्ट्रातील टेनिस स्टार कृष्णा सातपुते आणि एजाज कुरेशी सारखे खेळाडूंचा भरणा होता सामना चुरशीचा झाला दोन्ही संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी सरदार मैदान भरले होते.
प्रथम फलंदाजी करताना एवायएम संघाने मर्यादित 10 षटकात सात गडी बाद 116 धावा झळकविल्या त्यांच्या अक्षय पाटील (नाबाद 39 धावा), सिद्धेश वासकर (32 धावा) आणि अमित नाईक (25 धावा) यांनी चौफेर फटकेबाजीचे प्रदर्शन करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
प्रतिस्पर्धी संघाचे आव्हान मोरे इलेव्हन संघाला पेलवले नाही आणि त्यांना मर्यादित 10 षटकात 9 गडी बाद 69 धावाच काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी एवायएम बी अनगोळ संघाचा अक्षय पाटील हा ठरला.
उद्या शुक्रवार दि 13 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. शिवराज स्पोर्ट्स विरुद्ध साईराज वॉरियर्स, तर सकाळी 11 वाजता सरकार स्पोर्ट्स गांधीनगर विरुद्ध श्री स्पोर्ट्स खडक गल्ली, दुपारी 12:45 वाजता अल -रझा बेळगाव विरुद्ध राहुल्स के. आर. शेट्टी असे सामने होणार असून त्यानंतर दुपारी 2:30 वाजता पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील विजेत्या संघांमध्ये चौथा सामना खेळविला जाईल.