अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित अनिल बेनके करंडक 2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज सोमवारी झालेल्या सामन्यांमध्ये राहुल्स के. आर. शेट्टी (रायगड), मोहन मोरे इलेव्हन आणि साईराज वॉरिअर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले.
सरदार हायस्कूल मैदानावर आज सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात राहुल्स के. आर. शेट्टी (रायगड) संघाने प्रतिस्पर्धी रामराज इलेव्हन संघाला 77 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना राहुल शेट्टी इलेव्हन संघाने मर्यादित 10 षटकात 5 गडी बाद 153 धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान रामराज इलेव्हन संघाला पेलवले नाही आणि त्यांचा डाव 9.5 षटकात सर्व गडी बाद 76 धावा असा संपुष्टात आला. विजेत्या राहुल्स शेट्टी संघातर्फे जयकुमार (42 धावा), अंकुर सिंग (39 धावा) आणि बिलाल रजपूत (33 धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली, तर भेदक गोलंदाजी करताना आशिष मेहरुल याने अवघ्या 10 धावात रामराजच्या तब्बल 7 फलंदाजांना बाद करून त्यांना पॅव्हेलीयनचा रस्ता दाखविला. त्यामुळे आशिष नेहरुल हा या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला.
दुसऱ्या सामन्यात मोहन मोरे इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी श्रीराम सेना हिंदुस्तान (अनगोळ) संघावर 26 धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना मोरे इलेव्हन संघाने मर्यादित 10 षटकात 4 बाद 143 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीराम सेना हिंदुस्तान संघाला मर्यादित 10 षटकात 8 गडी बाद 117 धावा काढता आल्या. विजेत्या मोहन मोरे संघातर्फे मंगेश वैत्य (73 धावा) आणि रोहित नार्वेकर (35 धावा) यांनी शानदार फलंदाजी केली. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी मंगेश वैत्य हा ठरला.
तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने प्रतिस्पर्धी एवायएम ए अनगोळ संघाला 5 गड्यांनी पराभूत करून पुढली फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना एवायएम ए अनगोळ संघाने 9.5 षटकात सर्व बाद 73 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल साईराज वॉरियर्सने 5.5 षटकात 5 गडी बाद 74 धावा काढून सामना जिंकला. साईराजतर्फे अहमद असकर (29 धावा) याने उत्कृष्ट फलंदाजी करत ‘सामनावीर’ किताब पटकाविला.
आजचा शेवटचा चौथा सामना झेन स्पोर्ट्स आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता के आर शेट्टी रायगड या संघ यांच्यात खेळविला गेला. मात्र अंधुक प्रकाशामुळे हा सामना अर्ध्यावर थांबविण्यात आला असून तो उद्या मंगळवारी सकाळी 8वाजता पुढे खेळाविला जाणार आहे. रायगड संघाने निर्धारित दहा षटकात 100धावा केल्या प्रत्त्युत्तर दाखल खेळताना झेन स्पोर्ट्स मुंबई संघाने 4.1षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा बनवल्या त्यावेळी सामना थांबवण्यात आला.